Katrina Kaif Net worth : कतरिना कैफ बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. करिअरच्या सुरुवातील ती फक्त तिच्या सौंदर्यामुळे ओळखली जायची. परंतु, २००७ साली आलेल्या ‘नमस्ते लंडन’ या चित्रपटामुळे प्रेक्षकांचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि तिच्यातील अभिनयकौशल्याचं कौतुक झालं, पण यानंतर फक्त अभिनयापुरतं मर्यादित न राहता अभिनेत्री व्यावसायिक क्षेत्रातही तितकीच सक्रिय झाली, त्यामुळे आज कतरिना कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे.
काही वर्षांपूर्वी कतरिना बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होती. ‘भारत’, ‘झिरो’, ‘राजनीती’ आणि ‘एक था टायगर’ यांसारख्या चित्रपटांमुळे ती प्रसिद्धीझोतात आली. परंतु, यांसारखे हिट चित्रपट दिल्यानंतरही कतरिना फक्त अभिनयापुरतं मर्यादित न राहता व्यावसायिक क्षेत्रातही सक्रिय झाली. २०१९ मध्ये तिने तिचा ‘के ब्युटी’ हा मेकअप ब्रँड सुरू केला. कतरिनाचा यशस्वी अभिनेत्री ते यशस्वी उद्योजिका हा प्रवास कसा होता जाणून घेऊ…
कतरिना कैफची एकून संपत्ती किती?
कतरिनाने स्वत:चा के ब्युटी ब्रँड सुरू करण्यापूर्वी तिने नायका या मेकअप ब्रॅंडमध्ये २०१८ साली २.०४ कोटींची गुंतवणूक केलेली. या गुंतवणुकीतून तिला २२ कोटींचा फायदा झाला. मेकअप इंडस्ट्रीत इतकी स्पर्धा असतानाही कतरिनाने या इंडस्ट्रीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. कतरिनाला लहानपणापासूनच मेकअपची आवड होती. अभिनेत्रीने ‘हार्पर बझार इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबत सांगितलं होतं. ती म्हणालेली, “लहान असताना मला मेकअपची खूप आवड होती. वेगवेगळ्या रंगांच्या लिपस्टिक आणि वेगवेगळ्या क्रिम्स या सर्व गोष्टींचा वापर करून आपण अजून सुंदर दिसू शकतो ही गोष्ट मला खूप आवडायची”.
मेकअप ब्रँडबद्दल कतरिना कैफची प्रतिक्रिया
कतरिना पुढे म्हणाली, “जेव्हा मी मॉडेल म्हणून काम करायला सुरुवात केली आणि देशातील प्रसिद्ध मेकअप आर्टिस्टबरोबर काम केलं, तेव्हा मी त्यांच्याकडून सर्व गोष्टी शिकून घेतल्या आणि त्याचा मला पुढे फायदा झाला. कतरिना कैफसह अभिनेत्री क्रिर्ती सेनॅान, मसाबा गुप्ता, दीपिका पदुकोण आणि मीरा राजपूत यांचेदेखील स्वत:चे मेकअप ब्रँड आहेत. परंतु, अद्याप कतरिनाच्या ब्रँडच्या तुलनेत इतर अभिनेत्रींच्या ब्रॅंडला तितकं यश मिळालेलं नाही. ‘स्टोरीबॉर्ड १८’च्या वृत्तानुसार २०२४ मध्ये दीपिका पदुकोणच्या ब्रॅंडचं पहिल्या ९ महिन्यांमध्ये २५.१ कोटींचं नुकसान झालं आहे.
‘स्टोरीबॉर्ड १८’च्याच वृत्तानुसार २०२५ मध्ये फक्त सहा वर्षांत कतरिनाचा मेकअप ब्रॅंड देशातील नामांकित ब्रँडपैकी एक असल्याचं म्हटलं जातं. २०२५ मध्ये या ब्रॅंडला २४० कोटींचा फायदा झाला आहे. मेकअप ब्रॅंड व्यतिरिक्त कतरिनाची भारतात व भारताबाहेरही मालमत्ता आहे. (Dwello)च्या वृत्तानुसार कतरिनाचं अंधेरी येथे १७ कोटींचं आलिशान घर आहे, जिथे ती लग्नपूर्वी राहत होती. तर यासह अभिनेत्रीचं लंडनमध्येही ७.२ कोटींची किंमत असलेलं स्वत:चं घर आहे. सध्या अभिनेत्री विकी कौशलसह जुहू येथील आलिशान अपार्टमेंटमध्ये राहत आहे.
कतरिना कैफकडे आहे आलिशान गाड्यांचं कलेक्शन
कतरिना कैफकडे आलिशान गाड्यांचंसुद्धा कलेक्शन आहे. ‘जीक्यू’च्या वृत्तानुसार तिच्याकडे असलेली सर्वाधिक महागडी गाडी ही रेंज रोवर वोग एलडब्ल्यूबी, ज्याची किंमत २.३७ कोटी इतकी आहे. यासह तिच्याकडे ६६ लाखांची किंमत असलेली मर्सिडीज आणि एक कोटींची किंमत असलेली ऑडी क्यू७ ही गाडीदेखील आहे. ‘फिनकॅश’च्या मते, कतरिना कैफची एकूण संपत्ती २६३ कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे, ज्यामध्ये चित्रपट, ब्रँड एंडोर्समेंट, गुंतवणूक आणि तिच्या ब्युटी ब्रँडमधून मिळणाऱ्या कमाईचा समावेश आहे.