अभिनेत्री कतरिना कैफ, अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि इशान खट्टर यांच्या ‘फोन भूत’ या चित्रपटाची गेले काही दिवस तुफान चर्चा होती. अखेर हा चित्रपट काल म्हणजेच ४ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून कतरिना कैफचे चाहते तिला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी खूप दिवसांपासून उत्सुक होते. कारण लग्नानंतरचा तिचा हा पहिलाच चित्रपट आहे. पण तो उत्साह पहिल्या दिवशी चित्रपटगृहात दिसून आला नाही. या चित्रपटाचे पहिल्या दिवशीच कमाई आता समोर आली असून ती निर्मात्यांच्या अपेक्षेइतकी झालेली नाही.

कतरिना कैफ, ईशान खट्टर, सिद्धांत चतुर्वेदी यांनी गेले अनेक दिवस ‘फोन भूत’ या त्यांच्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले. विविध शहरांना त्यांनी भेटी दिल्या, विविध कार्यक्रमांना त्यांनू हजेरी लावली, इतकेच नव्हे तर छोट्या पडद्यावरील जवळपास प्रत्येक कार्यक्रमात त्यांची झलक पाहायला मिळाली. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता दिसली. त्यामुळे पहिल्याच दिवशी हा चित्रपट चांगली कमाई करेल असे सर्वांना वाटले होते. मात्र तसे काही झाले नाही.

आणखी वाचा : ‘द काश्मीर फाईल्स’ आणि ‘पुष्पा’च्या दिग्दर्शकांनी एकत्र येत प्रेक्षकांना दिली खास भेट, ट्वीट करत म्हणाले…

या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन आता समोर आले आहे. कतरिना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि इशान खट्टर यांच्या ‘फोन भूत’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ १.७५ – २.२५ कोटींची कमाई केली. पण हा चित्रपट वीकेंडला चांगला नफा कमवू शकतो अशी निर्मात्यांना अपेक्षा आहे. याआधी ‘राम सेतु’ आणि ‘थँक गॉड’ या बिग बजेट चित्रपटांकडेही प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले होते. त्यापाठोपाठ आता ‘फोन भूत’च्या बाबतीतही तसेच काहीसे घडत आहे.

कतरिना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि इशान खट्टर यांचा ‘फोन भूत’ यांची टक्कर काल जान्हवी कपूरच्या ‘मिली’, सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशीच्या ‘डबल एक्सएल’ या चित्रपटांशी झाली. ‘फोन भूत’ बरोबरच हे दोन चित्रपटदेखील काल प्रदर्शित झाले. त्यामुळे या तीन चित्रपटांपैकी आता बॉक्स ऑफिसवर कोणत्या चित्रपटाचे नाणे वाजणार ते पुढील काही दिवसात कळेल.

हेही वाचा : काय होतीस तू, काय झालीस तू…!; कतरिना कैफ नव्या लूकवरून ट्रोल

‘फोन भूत’ हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन गुरमीत सिंग यांनी केले आहे. त्याचबरोबर रितेश सिंधवानी आणि फरहान अख्तर यांनी मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित होणार होता, पण करोनामुळे त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते, मात्र प्रदर्शनाची तारीख बदलूनही हा चित्रपट फारशी चांगली कामगिरी करताना दिसत नाहीये.