Kesari Chapter 2 Box Office Collection Day 1 Updates : अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित ‘केसरी चॅप्टर २’ सिनेमा १८ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर काय जादू करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. करण सिंह त्यागी दिग्दर्शित या ऐतिहासिक सिनेमात प्रेक्षकांना कोर्टरुम ड्रामा पाहायला मिळत आहे. सध्या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर संथ वाटचाल सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

‘सॅकनिल्क’ने दिलेल्या वृत्तानुसार सिनेमाला पहिल्या दिवशी केवळ ७.५ कोटींची कमाई करता आली आहे. तसेच चित्रपटाने आगाऊ बुकिंगमध्ये दोन कोटी रुपयांची कमाई केली आहे.

आकडेवारीवरून असं दिसून येतं आहे की, ‘केसरी चॅप्टर २’ हा सिनेमा अक्षय कुमारच्या याआधीच्या ‘स्काय फोर्स’च्या पहिल्या दिवसाच्या कमाईला मागे टाकण्यात अपयशी ठरला आहे. कारण, जानेवारी महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘स्काय फोर्स’ सिनेमाने पहिल्या दिवशीच १२.५ कोटींचा गल्ला जमावला होता. यावरून ‘केसरी चॅप्टर २’ सिनेमाच्या पहिल्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची सुरुवात फारशी चांगली झालेली नाही हे स्पष्ट होतं. मात्र, वीकेंडला प्रेक्षक या सिनेमाला कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सध्या बॉक्स ऑफिसवर ‘केसरी चॅप्टर २’ व्यतिरिक्त ‘जाट’ आणि ‘सिकंदर’ हे सिनेमे आहेत. ‘जाट’ने पहिल्या दिवशी जवळपास ९.५ कोटी कमावले होते. तर, सलमान खानच्या ‘सिकंदर’ने पहिल्या दिवशी २६ कोटींची कमाई केली होती. या दोन्ही चित्रपटांची तुलना केली असता ‘केसरी २’ सिनेमाचं कलेक्शन फारच कमी आहे.

दरम्यान, ‘केसरी चॅप्टर 2’ १९१९ च्या जालियनवाला बाग हत्याकांडानंतर ब्रिटीश साम्राज्याविरुद्ध न्यायालयात लढा देणारे बॅरिस्टर सी. शंकरन नायर यांच्या जीवनावर आधारित आहे. सिनेमात अक्षयने नायर यांची भूमिका केली आहे. तसेच आर माधवनने सिनेमात ब्रिटीश वकिलाची भूमिका साकारली असून, अनन्या पांडे दिलरीत गिलच्या भूमिकेत झळकली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेली काही वर्शे अक्षय कुमारचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहेत. त्यामुळे ‘केसरी चॅप्टर २’कडून खिलाडी कुमारच्या चाहत्यांना प्रचंड अपेक्षा होत्या. आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला की फ्लॉप हे वीकेंडच्या कमाईवरून स्पष्ट होईल.