देशभरामध्ये दिवाळसणाचा उत्साह पाहायला मिळत आहे. प्रत्येकजण आपापल्या प्रियजनांसह हा सण साजरा करत आहे. या सेलिब्रेशनमध्ये बॉलिवूडचे सेलिब्रिटीही सामील झाले आहेत. करोनानंतरच्या पहिल्या दिवाळीचा आनंद सिनेकलाकार घेताना दिसत आहेत. दरवर्षी अमिताभ बच्चन यांच्या घरी दिवाळी निमित्त भव्य पार्टीचे आयोजन केले जाते. मागच्या दोन वर्षांमध्ये यामध्ये काहीसा खंड पडला होता. त्यामुळे या वर्षीची दिवाळी दणक्यात साजरी करण्याचा निर्णय बच्चन परिवाराने घेतला.
सोमवारी त्यांच्या प्रतिक्षा बंगल्यामधल्या पार्टीमध्ये शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान, अनुपम खेर आणि त्यांचे कुटुंब, करण जोहर अशा बऱ्याचशा सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या पार्टीमधले फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या पार्टीमधला एक व्हिडीओ करण जोहरने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यामध्ये त्याच्यासमोर किरण खेर बसलेल्या असल्याचे पाहायला मिळते.
या पार्टीला किरण यांनी लाल रंगाचा सलवार सूट घातला आहे. उत्तर भारतामध्ये करवा चौथ सणाला लाल रंगाचे कपडे घालण्याची प्रथा आहे. त्यामुळे त्यांना कपड्यावरुन चिडवत करण म्हणाला, “करवा चौथसाठी थोडा उशीर झाला आहे ना..?”, असे म्हटले. त्यावर किरण उत्तर देत म्हणाल्या, “तू तर गप्पच बस. माझं सोड. तू जो काही अनारकली बनून आला आहेस ना.. थोड्याच वेळात आतमध्ये मुजरा सुरु होणार आहे. इथे आलेल्या बाकी बायकांपेक्षा तू जास्त नटला आहेस.”
आणखी वाचा – “बिग बॉसमध्ये माझी बाजू दाखवली गेली नाही…” मेघा घाडगेचा धक्कादायक आरोप
त्यानंतर करणने मुद्दामून त्यांची मस्करी करत “मी घातलेले कपडे खूप शानदार आहेत. त्यांच्यावर भरीव एम्ब्रॉयडरी आहे. तुम्ही घातलेले कपडे फार साधे वाटत आहेत”, असे म्हणतो. पुढे किरण खेर म्हणतात, “अजिबात नाही. मी घातलेले कपडे खास माझ्यासाठी विणण्यात आले आहेत.” त्यावर पटकन करण म्हणाला, “त्यासारखं व्यक्तिमत्व असावं लागतं.” पुढे “माझं व्यक्तिमत्व तुझ्यापेक्षा चांगलंच आहे आणि ते सर्वांना माहीत आहे असे किरणजी म्हणाल्या.