समीर जावळे

Kishore Kumar Birthday : किशोर कुमार, हे नाव घेतलं तरीही डोळ्यांसमोर त्यांचा खेळकर चेहरा लगेच येतो. त्यापाठोपाठ आठवतो तो त्यांचा सुमधुर आवाज. आज याच आपल्या लाडक्या किशोर कुमार यांची जयंती. किशोर कुमार यांनी गायलेली गाणी आजही प्रचंड लोकप्रिय आहेत. शास्त्रीय संगीत न शिकलेला हा हरहुन्नरी गायक त्याच्या गोड आवाजाने आजही आपल्या मनावर राज्य करतो आहे.

बहुढंगी आणि हरहुन्नरी हेच विशेषण किशोर कुमार यांच्यासाठी योग्य

किशोर कुमार ( Kishore Kumar ) यांचं वर्णन जर एका शब्दात करायचं झालं तर बहुढंगी असंच करता येईल. अभिनय, गाणं, नाच, तोंडाने विशिष्ट आवाज काढण्याची ढब, पडद्यावर प्रचंड मस्ती करणारा नायक हा त्यांनी लीलया रंगवला. त्यांच्या अभिनयाचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘हाफ तिकिट’ नावाचा सिनेमा ‘ले गई मेरा दिल तेरी तिरछी नजरिया’ हे गाणं पाहिलं की किशोर कुमार पडद्यावर कशी धमाल करत होते त्याची साक्ष पटते. ‘चलती का नाम गाडी’मधलं ‘पाच रुपया बारा आना’, ‘इक लडकी भिगी भागी भागीसी’ ही गाणीही तशीच. किंवा मधुबालाचं हाल ‘कैसा है जनाब का’ हे गाणं असेल. कितीतरी गाणी सांगता येतील. जी आपण गुणगुणलो तरीही किशोर कुमार ( Kishore Kumar ) लगेच मनात येतो. अवघ्या ५८ वर्षांच्या आयुष्यात हा माणूस आपल्याला किती मोठी देणगी देऊन गेला हे जाणवतं.

किशोर कुमार आणि सैगल यांची भेट आणि..

किशोर कुमार ( Kishore Kumar ) हे शास्त्रीय संगीत शिकले नव्हते. त्यांचे गुरु होते कुंदनलाल सैगल. लहान असताना ते सैगल यांची गाणी गायचे. पण सैगल जसं गायचे किशोर कुमार गायचे. त्यांना मिळालेला आवाज देवाची देणगी होता. सैगल आणि किशोर कुमार ( Kishore Kumar ) यांची भेट झाली नाही असं अनेकांना वाटतं पण ती झाली होती. अशोक कुमार म्हणजेच किशोर यांचे मोठे बंधू आणि सगळ्यांचे लाडके दादामुनी किशोर कुमार ( Kishore Kumar ) यांना सैगल यांच्या घरी घेऊन गेले होते. त्यावेळी किशोरदा नऊ वर्षांचे होते. तिथे त्यांनी गाणंही म्हटलं. ज्यानंतर सैगल अशोक कुमार यांना म्हणाले, “अशोक तुझा भाऊ खूप छान गातो, पण त्यांच्यात एक अंगदोष आहे.” त्यावर सैगल यांना अशोक कुमार यांनी विचारलं काय दोष आहे तो? सैगल चटकन म्हणाले, “अरे किशोर गाणं म्हणताना स्थिर राहात नाही सारखा हलत असतो.” अमित कुमार यांनी एका मुलाखतीत ही आठवण सांगितली होती.

किशोर कुमार लतादीदींपेक्षा जास्त मानधन घ्यायचे

अमित कुमार यांनी याच मुलाखतीत ही आठवणही सांगितली होती की “किशोर कुमार ( Kishore Kumar ) गाण्यांसाठी लता मंगेशकरांपेक्षा जास्त मानधन घ्यायचे. सिनेमासाठी लता मंगेशकर जर ८० हजार घेणार असतील तर बाबा (किशोर कुमार) सांगायचे मी ९० हजार घेणार. यातली महत्त्वाची बाब ही होती की निर्माते पैसे मंजूर करायचे. घरी येऊन त्यांना पैसे द्यायचे कारण त्यांना वाटायचं की किशोर कुमार यांनी आपल्या चित्रपटात गाणं म्हणावं.”

हे पण वाचा- Video: जुई गडकरीनं काकांबरोबर गायलं किशोर कुमार व आशा भोसलेंचं लोकप्रिय गाणं, व्हिडीओ होतोय व्हायरल

‘रुप तेरा मस्ताना’ गाण्याची आठवण

किशोर कुमार ( Kishore Kumar ) आणि अमित कुमार एका गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी एस.डी. बर्मन यांच्या घरी गेले होते. त्यावेळी शक्ती सामंता, आर.डी. बर्मन आणि राजेश खन्ना हे तिघंही तिथे होते. किशोर कुमार यांना लक्षात की सचिनदा (ए.स.डी बर्मन) यांनी घरी बोलवलं पण आधी आलेले तिघं शांत बसलेत, काहीतरी गडबड आहे. एस.डी. बर्मन म्हणाले, “मी भाटियाली पद्धतीने एक गाणं केलं आहे. तू ते गाणं तसंच म्हणायचं आहे.” त्यावेळी शक्ती सामंता आले किशोर कुमार यांना म्हणाले की, “किशोर, सचिनदांनी गाणं केलंय पण मला ते आवडलेलं नाही. काही मजा येत नाहीये. मला हे भाटियाली वगैरे नको आहे.” एस.डी. बर्मन यांना लक्षात आलं त्यावेळी त्यांनी पुन्हा किशोर कुमार यांना बजावलं की मी म्हणतोय तसंच गायचं. आता हा प्रश्न कसा सोडवायचा? याचा विचार करतानाच किशोर कुमार यांना सचिनदांचं एक गाणं ज्याचे फक्त डमी शब्द लिहिले होते ते आठवलं. त्यांनी सचिनदांना सांगितलं माझं ऐका एक गाणं तुम्ही केलं होतं आठवतंय का? ते म्हणाले नाही मग किशोर कुमार ( Kishore Kumar ) यांनी डमी शब्दांची ती चाल त्यांना ऐकवली सचिनदा खुश झाले आणि ‘रुप तेरा मस्ताना, प्यार मेरा दिवाना’ हे आराधना सिनेमातलं गाणं जन्माला आलं.

Kishore Kumar Birth Day News
किशोर कुमार यांनी डमी चालीची आठवण सचिन देव बर्मन यांना करुन दिली आणि रुप तेरा मस्ताना हे गाणं जन्माला आलं.

किशोर कुमार महाविद्यालयीन आयुष्यापासूनच खोडकर

किशोर कुमार ( Kishore Kumar ) यांचा जन्म मध्य प्रदेशातल्या खंडवामध्ये झाला होता. त्यांचे वडील प्रतिष्ठीत वकील होते.अशोक कुमार आणि अनुप कुमार हे किशोरदांचे भाऊ. किशोर कुमार यांचं शिक्षण खंडवामध्ये पूर्ण झालं. त्यानंतर ते इंदूरला आले तिथे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतलं. कॉलेज मधल्या बेंचवर उभं राहून गाणं म्हण, नकला करुन दाखव, शिक्षकांचा आवाज काढ या सगळ्या गोष्टी किशोर कुमार यांनी त्या काळात केल्या होत्या. त्यांचं खरं नाव आभास कुमार गांगुली होतं. मात्र सिनेमा जगतात आल्यानंतर त्यांनी ते बदलून किशोर कुमार असं ठेवलं.

शिकारी या सिनेमातून त्यांनी अभिनय कारकीर्द सुरु केली

१९४६ मध्ये आलेल्या ‘शिकारी’ या सिनेमातून किशोर कुमार ( Kishore Kumar ) यांनी त्यांच्या अभिनयाची सुरुवात केली. तर १९४८ मध्ये त्यांनी पहिल्यांदा पार्श्वगायन केलं. त्यांनी ‘जिद्दी’ सिनेमात देवानंद यांच्यासाठी गाणं म्हटलं. किशोर कुमार यांनी त्यानंतर मागे वळून पाहिलंच नाही. देवानंद, अमिताभ बच्चन, राजेश खन्ना अशा अनेक स्टार्ससाठी गाणी म्हटली. राजेश खन्ना यांना त्यांचा आवाज खूप जास्त मॅच व्हायचा. तसंच राजेश खन्ना हे असे हावभावही करायचे की आपल्याला वाटायचं तेच गात आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Kishore Kumar Birth Day News
किशोर कुमार आणि सचिन देव बर्मन

किशोर कुमार नावाचा आनंदाचा झरा

आनंदी गाणी असोत, उडत्या चालीची असोत किंवा अगदी दर्दभरे गीत किशोर कुमार यांचा गाणी म्हणण्याचा आवाका खूप मोठा होता. त्यांनी ‘पडोसन’ या सिनेमात गायलेली गाणीही एकाहून एक हिट आहेत. तसंच राजेश खन्ना यांच्या ‘आराधना’, ‘मेहबुबा’, ‘हाथी मेरे साथी’, ‘कटी पतंग’, ‘दाग’, ‘आप की कसम’, ‘अजनबी’ अशा कितीतरी चित्रपटांसाठी किशोर कुमार ( Kishore Kumar ) हे राजेश खन्ना यांचा आवाज झाले. आजही त्यांच्या गाण्यांचं गारुड कायम आहे. त्यांची गाणी ही आजही ऐकावीशी वाटतात, ऐकली जातात. किशोर कुमार प्रेक्षकांचं पिढ्या अन् पिढ्या प्रेम लाभलेला एकमेव कलाकार आहे. त्याच्या आवाजाची जादू ही आजही आकर्षित करते, एक खास आठवण मनात जागवते यात शंका नाही. किशोर कुमार हे आनंदाचा स्वच्छंदी झरा होते. त्यांनी तो आनंद त्यांच्या गाण्यांतून सगळ्या जगाला वाटला आहे. त्यामुळे निर्मळ आणि मधुर आवाजाचा झरा आज मनामनांतून अवितरपणे वाहतो आहे.