Kishore Kumar refused to sing Amitabh Bachchans Khaike Paan Banaraswala: अमिताभ बच्चन यांचे अनेक चित्रपट गाजले आहेत, त्यापैकी १९७८ साली प्रदर्शित झालेला ‘डॉन’ हा त्यांचा सर्वात गाजलेला आणि आजही प्रेक्षकांच्या लक्षात राहिलेला चित्रपट आहे.

या चित्रपटाचे कथानक, दिग्दर्शन तसेच चित्रपटातील गाणी यामुळे हा सिनेमा एका वेगळ्या उंचीवर पोहोचला. खईके पान बनारसवाला या गाण्याचा तर वेगळा चाहतावर्ग आहे.

किशोर कुमार यांनी अमिताभ बच्चन यांच्या ‘खईके पान बनारसवाला’ गाण्याला दिलेला नकार

‘डॉन’ हा सिनेमा गाजला जरी असला तरी सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अनेक वाद झाले होते. तसेच काही किस्सेदेखील घडले होते, ज्याची आजही चर्चा होताना दिसते. आता गीतरचनाकार समीर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खईके पान बनारसवाला आधी चित्रपटाचा भाग नव्हते, असे वक्तव्य केले आहे.

समीर यांनी नुकतीच बीबीसी हिंदीला मुलाखत दिली. या मुलाखतीत समीर यांनी त्यांच्या करिअरबद्दल तसेच त्यांच्या वडिलांच्या म्हणजेच गीतरचनाकार अंजना यांच्या कामाबद्दलही वक्तव्य केले. वडिलांनी लोकप्रिय अभिनेत्यांबद्दल, दिग्दर्शकांबरोबर केलेल्या कामाबद्दल बोलताना समीर यांनी ‘डॉन’ चित्रपटातील ‘खईके पान’ या गाण्याबद्दल वक्तव्य केले. मनोज कुमार आणि जावेद अख्तर यांनी सुचवल्यामुळे त्या गाण्याचा चित्रपटात समावेश झाला. जेव्हा चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले, तेव्हा ‘खईके पान’ हे गाणे त्या चित्रपटाचा भाग नव्हते.

जेव्हा शूटिंग पूर्ण झाले, मनोज कुमार आणि जावेद अख्तर यांनी तो चित्रपट पाहिला, तेव्हा त्यांना असे जाणवले की चित्रपटाच्या दुसऱ्या भागात मोठ्या प्रमाणात अॅक्शन सीन आहेत, त्यामुळे त्यामध्ये कुठेतरी गाणे असायला हवे असे त्यांनी सुचवले. त्या गाण्यासाठी माझ्या वडिलांना बोलावले.

‘डॉन’ चित्रपटात ‘ये है बंबई नगरिया’ हे गाणे आधीपासूनच होते. तर माझ्या वडिलांनी विचार केला तसेच गाणे असायला हवे, त्यामुळे खईके पान हे गाणे लिहिले. मात्र, कल्याणजी-आनंदजींना सुरुवातीला वाटले की पानाबद्दलचे गाणे चालणार नाही, परंतु जावेद साहेबांनी त्यांना सांगितले की ते गाणे कसेही असले तरी चित्रपटात असणे आवश्यक आहे. हे सर्वांना पटवून देणे म्हणजे अर्धी लढाई जिंकल्यासारखे होते. जेव्हा सगळ्यांनी या गाण्याला होकार दिला, त्यानंतर किशोर कुमार ते गाणे रेकॉर्ड करण्यासाठी आले.

किशोर कुमार जेव्हा रेकॉर्डिंगसाठी आले, तेव्हा त्यांनी खूप गोंधळ घातला. ते जेव्हा केव्हा रेकॉर्डिंगसाठी यायचे तेव्हा खूप गोंधळ करायचे. त्यांना गाण्यातील चका-चक आणि खईके या शब्दांची समस्या होती. ते म्हणालेले की मी ‘खाके’ असा शब्दाचा उच्चार करेन. माझ्या वडिलांनी त्यांना विनंती केली आणि सांगितले की हे शब्द संस्कृतीचा आणि भाषेचा भाग आहेत आणि त्याशिवाय गाणे खरे वाटणार नाही.

त्यानंतर किशोर कुमार यांनी पान घेतले आणि थुकदान मागवले. त्यांनी सांगितले की मी एकदाच टेक देईन. पण, जेव्हा किशोर कुमार यांनी पान खाऊन ते म्हटले, तेव्हा ते किशोर कुमार आहेत असे वाटलेच नाही. त्यांच्याकडे पाहून, ते गाणे ऐकल्यानंतर असे वाटत होते की ते किशोर कुमार नाहीत तर बनारसच्या रस्त्यांवर जन्मलेला आणि वाढलेला माणूस आहे.”

या चित्रपटाचे शूटिंग होताना अनेक अडचणी निर्माण झाल्या. मात्र, जेव्हा डॉन चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा तो प्रचंड गाजला. अमिताभ बच्चन यांच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक ठरला. चंद्रा बारोट यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अमिताभ बच्चन, झीनत अमान, प्राण, इफ्तेखार आणि सत्येन कप्पू असे कलाकार होते.