Zaheer Khan shows son Photos to Virat Kohli : आयपीएल २०२५ मध्ये मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यादरम्यान सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी, विराट कोहली आणि नुकताच बाबा झालेला झहीर खान यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. रविवारी, लखनऊ सुपर जायंट्सच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर माजी क्रिकेटपटू झहीर खान विराट कोहलीला त्याच्या बाळाचे फोटो दाखवतानाचा एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला.
व्हिडीओमध्ये ते दोघेही एकमेकांना मिठी मारून भेटतात. त्यानंतर झहीर खान त्याच्या फोनमधील फोटो विराटला दाखवतो. झहीर विराटला म्हणतो, “हा बघ फतेहसिंह.” फोटो पाहून विराट कोहलीने विचारलं, “कसं चाललंय?” मग लगेच म्हणतो की फतेहसिंग “कोणासारखा दिसतो?” झहीर विचार करत असतानाच विराट अंदाज लावत त्याला म्हणतो, “मिक्स?” (झहीर व सागरिकासारखा) मग विराट झहीरला म्हणतो, “त्याचे डोळे अगदी तुझ्यासारखेच आहेत!” हे ऐकून झहीरच्या चेहऱ्यावर हास्य येतं आणि ते दोघे नंतर बोलत राहतात.
इन्स्टाग्रामवरील या सुंदर व्हिडीओने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आणि त्यावर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होऊ लागला. एका युजरने लिहिलं, “झहीर हा त्या क्यूट काकासारखा आहे जो त्याचं लहानसं बाळ कौतुकाने इतरांना दाखवतो.” तर दुसऱ्या युजरने लिहिलं, “एकाच फ्रेममध्ये दोन दिग्गज”. तर काहींनी विराटला लखनऊमधील छान ठिकाणं दाखव असं झहीरला म्हटलंय. एकूणच या व्हिडीओवर विराट व झहीरचे चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
पाहा व्हिडीओ –
लखनऊ सुपर जायंट्स व आरसीबीचा सामना मंगळवारी होणार आहे. क्रिकेट चाहत्यांनी २७ मे रोजी होणाऱ्या त्यांच्या आगामी सामन्याबद्दल उत्साह व्यक्त केला. “माझा आवडता गोलंदाज आणि माझा आवडता फलंदाज एकाच फ्रेममध्ये” असं म्हणत काही चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये रेड हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत.
झहीर खान सध्या लखनऊ सुपर जायंट्सचा मेंटॉर आहे. झहीर १६ एप्रिल रोजी बाबा झाला. त्याची पत्नी आणि अभिनेत्री सागरिका घाटगेने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. त्यांनी मुलाचं नाव फतेहसिंह खान ठेवलं आहे.
सागरिका व झहीर यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करून बाळाच्या जन्माची माहिती दिली होती. “प्रेम, कृतज्ञता आणि दैवी आशीर्वादांसह आम्ही आमचा गोंडस मुलगा फतेहसिंह खानचं स्वागत करत आहोत,” असं त्यांनी पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं होतं.
सागरिका घाटगेने २०१७ मध्ये भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानबरोबर लग्न केलं. या जोडप्याच्या लग्नाला सात वर्षे पूर्ण झाली आहेत.