शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन हे हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज कलाकार आहेत. दोघेही अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. बिग बी आणि शाहरुख खान या दोघांनीही आपल्या करिअरमध्ये एकाहून एक सरस चित्रपट दिले आहेत. गेली कित्येक वर्षं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे बिग बी आणि शाहरुख २८ व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होणार आहेत.
बिग बी त्यांच्या पत्नीसह म्हणजेच जया बच्चनसह हजेरी लावणार आहे. सध्या सगळीकडेच वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवांची क्रेझ आहे. सध्या बरेच सेलिब्रिटीज अशा वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवात हजेरी लावताना दिसत आहेत. कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १५ डिसेंबरपासून सुरू होत आहे, जो २२ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. वृत्तानुसार, या चित्रपट महोत्सवात शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांना ‘गेस्ट ऑफ ऑनर’ म्हणून सन्मान करण्यात येणार आहे.
आणखी वाचा : शाहरुख खानचा नवा ‘पठाण’लूक चांगलाच चर्चेत; नेटकरी म्हणाले, “हे बेकायदेशीर…”
या फिल्म फेस्टिव्हलमध्ये बिग बी आणि शाहरुख खानशिवाय बॉलिवूडचे इतर स्टार्स सहभागी होणार आहेत. या यादीत अभिनेत्री राणी मुखर्जी, दिग्दर्शक महेश भट्ट, गायक कुमार सानू आणि शत्रुघ्न सिन्हा यांसारख्या सेलिब्रिटींचा समावेश आहे. या चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या हस्ते होणार आहे.
शाहरुख खानला अलीकडेच सौदी अरेबियामध्ये आयोजित केलेल्या ‘रेड सी फिल्म फेस्टिव्हल २०२२’ मध्ये निमंत्रण दिलं होतं. त्यांच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग येथे आयोजित करण्यात आले होते आणि शाहरुखचा विशेष सन्मानही करण्यात आला होता. शाहरुखच्या आगामी ‘पठाण’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. २५ जानेवारी २०२३ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.