बॉलीवूड स्टार क्रिती सेनॉन सध्या तिच्या ‘क्रू’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. शाहीद कपूर अभिनीत ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ या चित्रपटाच्या यशानंतर आता ‘क्रू’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. जागतिक बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये १०० कोटींचा टप्पा या चित्रपटाने आतापर्यंत पार केला आहे. ‘क्रू’ चित्रपटात करीना कपूर, तब्बू व क्रिती मुख्य भूमिकांत आहेत.

नुकत्याच ‘झूम टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकत नाही तेव्हा महिला कलाकारांना जबाबदार धरलं जात का, याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा क्रिती म्हणाली, “हे खरंच खूप दु:खद आहे. काही वेळेस मीसुद्धा अशा त्रासदायक कमेंट्सना सामोरी गेले आहे. चित्रपट यशस्वी किंवा अपयशी ठरणे हे केवळ एका व्यक्तीच्या हातात नसते. त्यात पूर्ण टीमचा समावेश असतो. मी या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करते. माझं काम बोलावं, असं मला वाटतं. कारण- माझ्यासाठी यापेक्षा दुसरं काहीच महत्त्वाचं नाही आहे. लोक पटकन या सगळ्या गोष्टीचा दोष मुलींना देतात आणि हे फक्त चित्रपटांमध्येच नाही तर काही खेळांच्या क्षेत्रातसुद्धा घडतं. टीका ही टीका असते आणि ती होतच राहते. त्यामुळे तुम्ही नेहमी त्याकडे लक्ष देऊ शकत नाही.

क्रिती शशांक चतुर्वेदीच्या ‘दो पत्ती’ या आगामी चित्रपटामध्ये दिसणार आहे; ज्यात काजोल आणि तन्वी आझमी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. क्रिती या चित्रपटाची सह-निर्मातीदेखील आहे. मार्च २०२४ रोजी ‘नेक्स्ट ऑन द नेटफ्लिक्स’च्या कार्यक्रमात निर्माती म्हणून तिच्या पदार्पणाबद्दल क्रितीनं भाष्य केलं. ती म्हणाली होती, मिमीनंतर मला असं काहीतरी करायचं होतं जे मी यापूर्वी कधीही केलं नव्हतं. मला काही काळ अशी संधी मिळत नव्हती. मला असं वाटतं की, जेव्हा तुम्हाला उत्तेजित करणारी संधी सापडत नाही, तेव्हा तुम्हाला ती संधी तयार करावी लागते. निर्मातीसह अभिनेत्री म्हणूनही ‘दो पत्ती’ हा चित्रपट माझ्यासाठी एक संधीच आहे.”

हेही वाचा… “कृपया आता तरी भांडू नका”, ६ वर्षानंतर कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवरचा पुन्हा एकदा विमानाने प्रवास; चाहते म्हणाले…

दरम्यान, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या क्रू या चित्रपटात क्रितीने हवाई सुंदरीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात क्रितीसह करीना कपूर, तब्बू यांनीही मुख्य भूमिका साकारल्या आहेत. त्याचप्रमाणे दिलजीत दोसांझ, कपिल शर्मा, राजेश शर्मा, शाश्वत चॅटर्जी व कुलभूषण खरबंदा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका यात आहेत.