Kriti Sanon Talk about Gender Discrimination in Bollywood Industry : गेल्या अनेक वर्षांपासून क्रिती सेनॉन इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. क्रिती टॉप अभिनेत्रींच्या यादीत गणली जाते. अलीकडेच तिनं पुरुष कलाकारांच्या तुलनेत अभिनेत्रींबरोबर होणाऱ्या भेदभावाबद्दल सांगितलं आहे. क्रितीने सांगितले की, अनेक वेळा असे घडले आहे की नायकाला चांगली गाडी किंवा चांगली खोली मिळाली आहे.

एनडीटीव्हीशी बोलताना ती म्हणाली, “असे फारसे घडलेले नाही. पण, छोट्या छोट्या गोष्टी जसे की, पुरुष अभिनेत्याला चांगली गाडी किंवा चांगली खोली मिळणे. गोष्ट गाडीबद्दलची नाही, तर मी एक महिला आहे म्हणून मला कमी लेखले जावे, असे मला वाटत नाही. फक्त समान दर्जा द्या.”

क्रिती सेनॉन पुढे म्हणाली, “कधी कधी सहायक दिग्दर्शकांना सवय असते की, महिला कलाकारांना प्रथम बोलावले जाते आणि पुरुष कलाकारांची वाट पाहण्यास भाग पाडले जाते. मी त्यांना असे करू नका, असेही सांगितले आहे. मानसिकता बदलण्याची गरज आहे.” क्रिती सनॉन तिच्या अभिनयासह बेधडक वक्तव्यामुळेही चर्चेत असते.

क्रिती सेनॉनबद्दल बोलायचे झाले, तर तिच्या आणि तिचा कथित बॉयफ्रेंड कबीरच्या नात्याच्या चर्चा गेल्या वर्षभरापासून सातत्याने रंगत आहेत. दोघे अनेक वेळा एकत्र कार्यक्रमामध्ये दिसले आहेत. मात्र, अद्याप त्यांनी त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. इंडस्ट्रीतील काही सूत्रांच्या म्हणण्यानुसार, ते दोघे खूप जवळचे मित्र आहेत; पण त्यांनी त्यांच्या नात्याला नाव दिलेले नाही. मीडिया आणि चाहत्यांकडून मात्र सतत त्यांच्या अफेअरबद्दल चर्चा सुरू असते.

क्रितीने तिच्या कारकिर्दीची सुरुवात ‘हिरोपंती’ या चित्रपटातून केली. त्यानंतर तिने ‘दिलवाले’, ‘राबता’, ‘बरेली की बर्फी’, ‘लुका छुपी’, ‘अर्जुन पटियाला’ ‘हाऊसफुल ४’, ‘पानिपत’, ‘मिमी’, ‘हम दो हमारे दो’, ‘बच्चन पांडे’, ‘शहजादा’, ‘गणपथ’, ‘तेरी बतों में ऐसा उलझा जिया’, ‘क्रू’ यांसारखे चित्रपट केले आहेत. ‘मिमी’ या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. ‘मिमी’मध्ये ती सरोगेट मदरच्या भूमिकेत दिसली होती.

ती शेवटची ‘दो पत्ती’ या चित्रपटात दिसली होती. तिने ‘दो पत्ती’ची निर्मितीही केली होती. आता ती ‘तेरे इश्क में’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटामध्ये ती साऊथ स्टार धनुषबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. त्याशिवाय ती ‘कॉकटेल २’मध्येही दिसणार आहे. क्रितीच्या चित्रपटांबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत.