बॉलीवूड गायक कुमार सानू यांचे खासगी आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं आहे. मग ते त्यांच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी रीटा भट्टाचार्य यांच्याबरोबरच्या वादग्रस्त घटस्फोटामुळे असो किंवा ‘बिग बॉस १९’मधील सहभागी झालेल्या अभिनेत्री कुनिका सदानंद यांच्याबरोबरच्या संबंधांमुळे असो.
अशातच अलीकडील एका मुलाखतीत कुमार सानू यांच्या एक्स पत्नी रीटा यांनी खुलासा केला की, जेव्हा त्या त्यांचा मुलगा (जान) साठी गरोदर होत्या, तेव्हा सानू यांच्या कुटुंबीयांनी त्यांना मानसिक त्रास दिला. तसंच कुमार सानू यांच्या प्रेमसंबंधांबद्दल आणि त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दलही त्यांनी सांगितलं.
फिल्म विंडोबरोबरच्या संभाषणात रीटा म्हणाल्या, “तो उत्तम गायक आहे यात शंका नाही, पण माणूस म्हणून त्यांच्याबद्दल जितकं कमी बोलावं तितकं चांगलं. त्यांना गायक बनवणं हे माझं स्वप्न होतं. मीच त्यांना प्रोत्साहन दिलं. आमच्याकडे मुंबईत आल्यानंतर ना पैसे होते, ना गाडी… सगळं शून्यापासून सुरू झालं. कुमार सानू यांना ‘कुमार सानू’ व्हायला मीच मदत केली. ‘आशिकी’ चित्रपटाच्या यशानंतर त्यांना खूप पैसा मिळायला लागला आणि तेव्हापासून त्यांच्यात बदल होऊ लागला, त्यापूर्वी ते कधीच तसे नव्हते.”
घटस्फोटाबाबत रीटा यांनी सांगितलं की, “मी मुलगा जानच्या वेळी गरोदर होते, तेव्हा मी माझे वडील गमावले. तेव्हाच त्यांनी मला क्रूरतेच्या आधारावर न्यायालयात खेचलं. तेव्हा मला नीट जेवणही दिलं जात नव्हतं. मला सतत त्रास दिला जात असे. त्यांनी मुलांसाठी दूध आणणंही थांबवलं आणि डॉक्टरांना सांगितलं की, तुमची फी आम्ही देणार नाही. त्यांना माणूस म्हणणंच चुकीचं आहे.”
पुढे त्यांनी सांगितलं की, “घस्फोटाबाबत कधीही त्यांच्याशी थेट बोलू शकले नाही. मला माझ्या मृत्यूपूर्वी त्यांच्याकडून कारण जाणून घ्यायचं आहे. त्यावेळी त्यांचे दुसर्या स्त्रीशी संबंधही होते, ते आज समोर आले आहे. मग त्यांनी मला कोर्टात कशासाठी नेलं? तेव्हा मी खूप लहान होते. असं वाटलं की माझं संपूर्ण जगच उद्ध्वस्त झालं आहे आणि याचा माझ्या कुटुंबालाही धक्का बसला.”
जान कुमार सानू इन्स्टाग्राम पोस्ट
दरम्यान, कुमार सानू आणि रीटा यांच्या नात्याबद्दल सांगायचं झाल्यास, कुमार सानू यांनी १९८६ मध्ये रीता भट्टाचार्य यांच्याशी लग्न केले आणि त्यांना जिको, जस्सी आणि जान अशी तीन मुलं आहेत. १९९४ मध्ये कुमार सानू यांचा घटस्फोट झाला, त्याचे कारण कुनिका सदानंद यांच्याबरोबरचं अफेअर होते असं म्हटलं जातं. घटस्फोटानंतर मुलांची जबाबदारी रीता यांना मिळाली.