Kumar Sanu Ex Wife Rita Bhattacharya : गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडचे लोकप्रिय गायक कुमार सानू यांचं खाजगी आयुष्य चर्चेत आलं आहे. कुमार सानू यांचं खरं नाव आहे केदारनाथ भट्टाचार्य. त्यांनी १९८६ मध्ये रीटा भट्टाचार्य यांच्याशी लग्न केलं होतं. जवळपास ८ वर्षांच्या संसारानंतर १९९४ मध्ये रीटा व कुमार सानू विभक्त झाले. या दोघांना तीन मुलं आहेत. आता घटस्फोटानंतर जवळपास ३१ वर्षांनी रीटा यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत कुमार सानू यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
‘लग्नानंतर काही वर्षांनी कुमार सानू यांनी खूप छळ केला’ असं रीटा यांनी ‘फिल्म विंडो’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. “हा माणूस प्रचंड धूर्त आणि वाईट आहे. तिसऱ्या प्रेग्नन्सीदरम्यान या माणसाने माझा बराच छळ केला. मला घराबाहेर जाऊ दिलं नाही, खाण्यापिण्याचे हाल केले” असे आरोप रीटा यांनी केले आहेत.
रीटा म्हणतात, “गर्भवती असताना कुमार सानूंनी मला घटस्फोटाच्या कायदेशीर लढाईत ओढलं, माझा विश्वासघात केला. त्यावेळी त्यांचे प्रेमसंबंध होते, जे आज सर्वांसमोर उघड झाले आहेत. तेव्हा मी वयाने फार लहान होते…या सगळ्यामुळे माझं संपूर्ण जग उद्धवस्थ झालं. मला घराबाहेर मित्र-मैत्रिणी बनवण्यास परवानगी नव्हती. आम्ही खूप सहन केलं.”
घटस्फोट झाल्यावर मुलांना घेऊन राहण्यासाठी रीटा यांना घर हवं होतं. यावेळी कुमार सानूंचा बंगला मिळावा यासाठी त्यांनी मागणी केली होती. पण, त्यांना न्याय मिळत नव्हता. शेवटी एका मुलाखतीत रीटा यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे मदत मागितली. हा प्रसंग रीटा यांनी स्वत: सांगितला आहे.
रीटा भट्टाचार्य पुढे सांगतात, “मला तेव्हा राहण्यासाठी घर नव्हतं. त्याचदरम्यान मी एक मुलाखत दिली होती. मला कुठेच न्याय मिळत नव्हता…मी फार वैतागून गेले होते. शेवटी मी इंटरव्ह्यूमध्ये बोलले होते की, मी गुन्हेगार नाहीये मला, न्याय हवा आहे. मला कुठेच न्याय मिळाला नाहीतर मी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे मदत मागेन. माझी ही मुलाखत सुदैवाने बाळासाहेब ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचली. त्यानंतर मला राज ठाकरेंनी फोन करून काकांनी तुम्हाला भेटायला बोलावलं आहे असं सांगितलं. तेव्हा मी पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरेंना भेटले.
“बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊन मी सगळी परिस्थिती त्यांना सांगितली. त्यांच्याकडे मी न्यायाची मागणी केली. त्यानंतर बाळासाहेबांनी मला ‘आशिकी बंगला’ मिळवून दिला होता. त्यातील ५० टक्के हिस्सा माझ्या नावावर होता आणि उर्वरित ५० टक्के भाग इतर पाच जणांच्या नावावर होता. त्यावेळी बाळासाहेबांनी कुमार सानूंना देखील समोर बोलावलं होतं. आम्हा दोघांना सगळ्या गोष्टी समोरासमोर विचारल्या त्यांनी मला खूप मोठी मदत केली, ही मी मदत मी कधीच विसरू शकणार नाही” असं रीटा भट्टाचार्य यांनी सांगितलं.