Lagnanantar Hoilach Prem Fame Actress Talks About Rekha : रेखा बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. आजवर त्यांनी अनेक चित्रपटांत विविध भूमिका साकारत त्यांच्या अभिनयाने व सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनात जणू कायमचं घर केलं आहे. त्यामुळेच फक्त प्रेक्षकच नाही तर अनेक कलाकारदेखील त्यांच्या कामाचं कौतुक करतात.

इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत, ज्यांचं त्यांच्याबरोबर काम करण्याचं स्वप्न आहे. अशातच आता ‘स्टार प्रवाह’वरील ‘लग्नानंतर होइलच प्रेम’ मालिकेतील अभिनेत्रीने त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळाही दिला आहे.

‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत वसु आत्या ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री संयोगिता भावे यांनी रेखा यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांना जेव्हा “तुम्ही साकारलेल्या लोकप्रिय भूमिकांबद्दल बोललं जातं, तेव्हा ‘लज्जा’ चित्रपटातील भूमिकेचं नाव येतंच. यासाठी तुम्हाला अनेकजण ओळखतात. तर ‘लज्जा’चा नेमका काय किस्सा आहे”, असा प्रश्न विचारला.

संयोगिता याबद्दल म्हणाल्या, “मी एक हॉलीवूड फिल्म केलेली. तेव्हा मी रामोजीमध्ये शूटिंग करत होते आणि त्यावेळी माझा एक मित्र आहे तो ‘लज्जा’मध्ये आहे; तर तो मला तिथे भेटला आणि म्हणाला, ये ना सेटवर मी तुझी ओळख करून देतो. मी म्हटलं ठीक आहे. मी गेले, मग त्यांनी माझी राजजींचा असिस्टंट होता त्याच्याशी ओळख करून दिली. तर तो म्हणाला, तुम्ही इथे किती दिवस आहात. मी म्हटलं आहे मी महिनाभर इथेच असते.

संयोगिता याबद्दल पुढे म्हणाल्या, “त्याने मला संध्याकाळी भेटायला बोलावलं. तर त्याने राजजींना सांगितलं आणि मला वाटतं त्यांनी दुसऱ्या कोणाची तरी निवड केलेली, पण ती परफॉर्म करू शकली नाही, त्यामुळे त्यांना रिप्लेस करायचं होतं. तर मी राजजींना भेटले. त्यांना आवडलं, त्यांनी माझी निवड केली आणि माझा पहिलाच सीन गुलशन ग्रोवरबरोबर होता. दुसरा सीन रेखा आणि मनीषा कोइरालाबरोबर होता. मला खूप छान वाटलं. अनुभव खूप वेगळा होता.”

‘लज्जा’ चित्रपटाबद्दल संयोगिता पुढे म्हणाल्या, “पहिल्यांदा माझ्याकडे कोणी बघतही नव्हतं, सेटवर आहे की नाही. सीन सुरू व्हायच्या आधी राजकुमार संतोषींनी बोलावलं आणि म्हणाले, हा तुझा सीन आहे आणि तुला चांगलं काम करायचं आहे. खूप तणाव होता तेव्हा. त्याच्यात रेखा आणि मनीषा कोइराला समोर होत्या, त्यामुळे त्यांच्यासमोर काम करायला धडधड होत होतं. पण, पहिलाच टेक झाला, त्यानंतर रेखाजी मला म्हणाल्या की, तुला मी काही सुचवलं तर चालेल का? मी विचार केला की, एवढी मोठी बाई मला विचारतेय सुचवलं तर चालेल का? मी म्हटलं, हो मॅम.”

रेखा यांनी दिलेला ‘हा’ सल्ला

रेखा यांच्याबरोबरचा किस्सा सांगत संयोगिता पुढे म्हणाल्या, “रेखा मला म्हणाल्या, मी एकलंय की तू रंगभूमीवर काम केलं आहेस. तू जेव्हा सीन करताना माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडतेस ना, तर मला मिठी मारून रड. म्हटलं बरं आणि आम्ही केलं. त्यानंतर पहिला टेक झाल्या झाल्या माझ्यासाठी एक खुर्ची होती. एक स्पॉट बॉय पाण्याची बाटली घेऊन उभा होता. तर मला हे झेपलं नाही. तेव्हा माझी एक मैत्रीण होती. ती म्हणाली, हे लोक तुमचं निरीक्षण करतात की तुम्ही कशा पद्धतीचं काम करत आहात आणि मग तुम्हाला आदर देतात आणि तू तो पहिल्याच सीनमधून मिळवलास.”