श्रीदेवी हे नाव ऐकताच आजही कित्येक चित्रपटप्रेमी हळहळ व्यक्त करतात. श्रीदेवी यांचा मृत्यू मनाला चटका लावूनच गेला. नंतर त्याबद्दल बऱ्याच गोष्टी बोलल्या गेल्या पण एवढ्या मोठ्या अभिनेत्रीचं असं निधन कोणालाच पचलं नव्हतं. श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्यात नेमकं नातं कसं होतं, याविषयी त्यांची मुलगी आणि अभिनेत्री जान्हवी कपूरने खुलासा केला आहे. श्रीदेवी यांनी बोनी यांची सिगरेट सुटावी म्हणून स्वतःच्या तब्येतीची हेळसांड केली होती असंही जान्हवीने स्पष्ट केलं आहे.
श्रीदेवी आणि बोनी यांनी १९९६ मध्ये लग्न केलं. त्यांची मोठी मुलगी म्हणजे जान्हवी कपूर आणि धाकटी म्हणजे खुशी कपूर. याच दरम्यान चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान बोनी यांना लागलेल्या धूम्रपानाच्या सवयीबद्दल जान्हवीने एका मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार जान्हवी म्हणते, “जेव्हा आम्ही जुहू येथे राहायचो तेव्हा बाबा ‘नो एंट्री’ आणि ‘वॉन्टेड’ या चित्रपटांवर काम करत होते आणि या दरम्यानच त्यांना धूम्रपानाची खूप सवय लागली. मी आणि खुशी दररोज त्यांची सिगारेटची पाकीटे नष्ट करायचे वेगवेगळे पर्याय शोधायचो. सिगारेट कापायचो, त्यांच्या बॉक्समध्ये पेस्ट भरायचो, पण त्यांची सवय सुटतच नव्हती.”
आणखी वाचा : ‘कांतारा’ची यशस्वी घोडदौड सुरूच; ‘केजीएफ’ला मागे टाकत चित्रपटाने कमावले इतके…
श्रीदेवी यांनीदेखील त्यासाठी खूप प्रयत्न केले, त्या बोनी यांच्याशी भांडायच्या. याबद्दल जान्हवी म्हणते, “बाबांनी धूम्रपान सोडावं यासाठी आई पूर्णपणे शाकाहारी झाली होती. तिने मांसाहार पूर्णपणे सोडला होता. जोवर बोनी सिगारेट सोडत नाही तोवर मी अजिबात नॉनव्हेज खाणार नाही असा तिने चंगच बांधला होता. तिची तब्येत कमकुवत असल्याने डॉक्टरांनी तिला व्यवस्थित सकस आहार आणि नॉनव्हेज खायला सांगितलं होतं. बाबा तिची खूप विनवणी करायचे पण तिने ऐकलंच नाही. अखेर ४ वर्षांपूर्वी बाबांनी सिगारेट सोडली. ते म्हणाले ती असताना एवढं म्हणायची पण तेव्हा मला जमलं नाही, किमान आता तरी प्रयत्न करून सोडतो.”
२४ फेब्रुवारी २०१८ यावर्षी दुबई येथे एका घरगुती सोहळ्यात श्रीदेवी यांचा मृत्यू झाला. जान्हवी सध्या सोशल मिडियावर चांगलीच सक्रिय आहे. आपल्या बाबांच्या चित्रपटात आता जान्हवी झळकणार आहे. ‘मिलि’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांनी त्याला चांगलीच पसंती दर्शवली आहे. याबरोबरच ती वरुण धवनबरोबर आगामी ‘बवाल’ या चित्रपटातही झळकणार आहे.