बॉलीवूड अभिनेता सलमान खान नेहमी चर्चेत असतो. सलमानला आत्तापर्यंत अनेक वेळा जिवे मारण्याची धमकी आली आहे. याप्रकरणी अलीकडेच एका संशयित अल्पवयीन व्यक्तीला पकडण्यात आले होते. मात्र, धमकीचा मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा पोलीस अद्यापही शोध घेत आहे. आता पोलिसांनी या आरोपीविरोधात लूक आऊट नोटीस जारी केली आहे. विशेष म्हणजे हा संशयित आरोपी हरयाणाचा रहिवासी असून तो ब्रिटनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा- “ज्यांना हा चित्रपट प्रोपगंडा वाटतो ते…,” ‘द केरला स्टोरी’च्या वादावर अनुपम खेर यांनी मांडले परखड मत
मिळालेल्या माहितीनुसार, या आरोपीने मार्च महिन्यात सलमानच्या जवळच्या मित्राला गोल्डी ब्रारच्या नावाने धमकीचा ईमेल पाठवला होता, त्यात सलमान खानला जिवे मारण्याची धमकी दिली होती. या ईमेलनंतर सलमानच्या मित्राने पोलिसांत तक्रार दाखल केली. तेव्हापासून पोलीस या व्यक्तीचा शोध घेत आहेत. मात्र, अद्यापपर्यंत या व्यक्तीची माहिती पोलिसांना मिळू शकलेली नाही. त्यामुळे पोलिसांनी आरोपीविरोधात लूक आउट नोटीस जारी केली आहे.
सलमान खानला पाठवलेल्या कथित मेलमध्ये जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या मेलमध्ये लिहिले होते, ‘गोल्डी भाई (गोल्डी ब्रार) यांना तुमच्या बॉस सलमान खानशी बोलायचे आहे. लॉरेन्स बिश्नोई यांची मुलाखत तुम्ही पाहिलीच असेल. बघितली नसेल तर बघायला सांगा. प्रकरण बंद करायचे असेल तर प्रकरण मिटवा. समोरासमोर बोलायचे असेल तर सांगा. आता वेळीच कळवले आहे, पुढच्या वेळी फक्त धक्काच मिळेल.
हा मेल १८ मार्च २०२३ रोजी दुपारी १.४६ वाजता सलमानच्या मित्राला पाठवण्यात आला होता. त्यानंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सतत येणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर सलमानने सुरक्षिततेसाठी नवीन बुलेटप्रूफ कारही खरेदी केली आहे. याशिवाय त्याला मुंबई पोलिसांकडून Y+ सुरक्षादेखील देण्यात आली आहे.