Madhuri Dixit Distance From Sanjay Dutt : बॉलीवूड अभिनेता संजय दत्त त्याच्या सिनेमांबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिला आहे. त्याच्या अफेअरच्या अनेकदा चर्चा झाल्या आहेत. ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितबरोबरही त्याचं अफेअर होतं असं म्हटलं जातं. ‘साजन’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान माधुरी दीक्षित आणि संजय दत्त यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. पण १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्तला अटक झाली आणि या घटनेनंतर माधुरीने त्याच्यापासून अंतर ठेवायला सुरुवात केली, असं म्हटलं जातं.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, चित्रपट पत्रकार आणि लेखक हनीफ झवेरी यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, एकदा एका चित्रपटाच्या पार्टीत माधुरीने संजयबरोबर फोटो नको म्हणून मुद्दाम टाळाटाळ केली. संजयला जामीनवर सोडण्यात आलं होतं. त्यावेळी निर्मात्यांनी माधुरी आणि संजय यांच्याबरोबर एकत्र पत्रकार परिषद घेतली होती.

हनीफ झवेरी म्हणाले, “संजय दत्त जेव्हा जेलमध्ये होता, तेव्हा फिल्म इंडस्ट्रीने त्याच्या अटकेविरोधात निषेध केला. पण माधुरीने त्यात भाग घेतला नाही.” संजय जामीनवर बाहेर आल्यावर, ‘महानता’ या चित्रपटाचे दिग्दर्शक अफजल खान यांनी पार्टीचं आयोजन केलं होतं, त्या पार्टीला ती आली होती. मीसुद्धा तिथं होतो. तेव्हा माधुरी तिच्या सेक्रेटरीसह आली, पण ती स्टेजकडे न जाता माझ्याजवळच्या खुर्च्यांवर बसली.”

त्यांनी पुढे सांगितलं, “माधुरीने स्टेजवर संजयला पाहिलं आणि ती मुद्दाम त्याच्यापासून लांब राहात होती. मला वाटलं की, ती थोड्या वेळात स्टेजवर जाईल. पण तसं न होता, ती आणि तिचे लोक तिथून निघून गेले. सर्व फोटोग्राफर्स संजय आणि माधुरीचा एकत्र फोटो घेण्यासाठी वाट पाहत होते. पण माधुरीने जाणूनबुजून संजयबरोबर फोटो काढणं टाळलं.”

माधुरी दीक्षित इन्स्टाग्राम पोस्ट

माधुरी आणि संजय यांच्या नात्याबद्दल अधिक माहिती देताना झवेरी म्हणाले, “माधुरी आणि संजय काही काळ एकत्र होते. माधुरीच्या आईला ती लवकर स्थिर व्हावी असं वाटायचं. पण संजयला अटक झाल्यावर माधुरीने दूर होणंच योग्य समजलं. तिला वाटत होतं की, आपणही अडचणीत येऊ शकतो.” पुढे अनेक वर्षांनी माधुरी दीक्षित आणि संजय दत्तने ‘कलंक’ या चित्रपटात पुन्हा एकत्र काम केलं.