Madhuri Dixit Husband Dr. Nene : माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेनेंनी २०११ मध्ये अमेरिकेतील हार्ट सर्जनची नोकरी सोडून भारतात परण्याचा निर्णय घेतला होता. यंदाच्या जानेवारी महिन्यात आयएनकेच्या संस्थापक आणि सीईओ लक्ष्मी प्रॅटुरी यांनी आयोजित केलेल्या एका पॅनेलच्या चर्चेत डॉ. नेने सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी वैयक्तिक आयुष्यातील बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला.

डॉ. नेनेंचा नोकरी सोडून भारतात येण्याचा निर्णय त्यांच्या आई-बाबांना त्यावेळी पटला नव्हता. याशिवाय माधुरीशी लग्न झाल्यानंतर आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं असंही ते म्हणाले.

डॉ. श्रीराम नेने UCLA ( कॅलिफोर्निया विद्यापीठ-लॉस एंजेलिस ) याठिकाणी हार्ट सर्जन म्हणून काम करायचे. त्यावेळी बऱ्याच सेलिब्रिटींवर उपचार केल्याचं त्यांनी सांगितलं. डॉ. नेने म्हणाले, “मी अनेक सेलिब्रिटींवर उपचार केले आहेत. माझं लग्न होण्याआधी सुद्धा मी बऱ्याच सेलिब्रिटींना ओळखायचो. पण, लग्नाआधी बाहेरच्या जगात मला फारसं कोणीही ओळखत नव्हतं. माधुरीशी लग्न झाल्यावर परिस्थिती पूर्णपणे बदलली. आता प्रत्येकाला माझ्याबरोबर सेल्फी हवा असतो.”

डॉ. नेने पुढे म्हणाले, “माझी पत्नी माझ्यापेक्षा जास्त प्रसिद्ध आहे…आणि हे अगदी खरं आहे. मी फक्त जोडीदार म्हणून तिची साथ देतोय. वैयक्तिक आयुष्यात ती प्रचंड नम्र आहे. तिला त्यावेळी अमेरिकेत सुद्धा सर्वत्र ओळखलं जायचं. पण, मी कधीच तिच्याकडे एक अभिनेत्री म्हणून पाहिलं नाही कारण, ती माझी पत्नी आहे, माझी जोडीदार आहे. लग्नानंतर आपला जोडीदार हा खूप महत्त्वाचा असतो. कारण, आयुष्यातील प्रत्येक गोष्टीत आपण एकमेकांना साथ देणं गरजेचं असतं.”

“माधुरी खूप जास्त विनम्र आहे. ती तिच्या सगळ्या चाहत्यांशी प्रेमाने वागते. प्रत्येकाचा आदर करते. याशिवाय आमचं लग्न झाल्यावर सुद्धा माधुरीने सगळ्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळली. मला तिचा हा स्वभाव फार आवडतो. जेव्हा आपण अभिनय क्षेत्रात काम करत असतो तेव्हा, वैयक्तिक आयुष्यात आपल्याला सामान्य लोकांसारखं वागता आलं पाहिजे. अमेरिकेत आम्हाला सहज फिरता यायचं पण, भारतात हे शक्य नाही. ” असं डॉ. नेनेंनी सांगितलं.

दरम्यान, माधुरी आणि डॉ. श्रीराम नेने यांचं लग्न १९९९ मध्ये पार पडलं होतं. या जोडप्याला २ मुलं आहेत. लग्नानंतर साधारण १० वर्षे माधुरी अमेरिकेत राहिली आणि त्यानंतर भारतात परतली. भारतात आल्यावर ‘धकधक गर्ल’ने पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये सक्रिय होऊन विविध चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.