माधुरी दीक्षित व डॉ. श्रीराम नेने यांचा विवाहसोहळा १९९९ मध्ये अमेरिकेत पार पडला होता. त्याकाळी ‘धकधक गर्ल’ हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री होती. त्यामुळे बॉलीवूडच्या स्टार अभिनेत्रीशी लग्न केल्यावर आयुष्य कसं बदललं? असा प्रश्न डॉ. नेनेंना रणवीर अलाहबादियाने त्याच्या पॉडकास्टमध्ये विचारला होता.

माधुरीचे पती डॉ. नेने यांनी काही महिन्यांपूर्वी रणवीर अलाहबादियाच्या पॉडकास्टमध्ये उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी प्रोफेशनल व वैयक्तिक आयुष्याबद्दलच्या अनेक गोष्टींबाबत खुलासा केला.

माधुरी दीक्षितला ९० च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखलं जायचं. त्यांच्याशी लग्न झाल्यावर आयुष्य कसं बदललं? भारतात तुम्ही विशेष प्रसिद्धीझोतात आलात का? याविषयी डॉ. नेने म्हणाले, “भारतात काय अमेरिकेत सुद्धा अशीच परिस्थिती होती. कारण, तिला सर्वत्र ओळखलं जायचं. पण, मी कधीच तिच्याकडे एक अभिनेत्री म्हणून पाहिलं नाही कारण, ती माझी पत्नी आहे, माझी जोडीदार आहे.”

डॉ. नेने पुढे सांगतात, “माधुरी अभिनेत्री सर्वांसाठी आहेच पण, माझ्यासाठी ती माझी जोडीदार आणि माझी पत्नी आहे. लग्नानंतर आपला जोडीदार हा खूप महत्त्वाचा असतो. कारण, आयुष्यातील प्रत्येक गोष्टीत आपण एकमेकांना साथ देणं गरजेचं असतं. मला तिचा भूतकाळ माहिती नाही आणि तिलाही माझ्या भूतकाळाबाबत काहीच माहीत नव्हतं. आमच्या दोघांचं प्रोफेशन सुद्धा खूप वेगळं आहे. पण, आमची कौटुंबिक पार्श्वभूमी एकदम सारखी होती. आम्ही दोघंही महाराष्ट्रातले त्यात आमची मातृभाषा एकच आहे. शेवटी आपल्याला समजून घेणारा जोडीदार भेटला तर, आयुष्यात खूप गोष्टी सोप्या होतात.”

“माधुरी खूप जास्त विनम्र आहे. ती तिच्या सगळ्या चाहत्यांशी प्रेमाने वागते. प्रत्येकाचा आदर करते. मला तिचा हा स्वभाव फार आवडतो. जेव्हा आपण अभिनय क्षेत्रात काम करत असतो तेव्हा, वैयक्तिक आयुष्यात आपल्याला सामान्य लोकांसारखं वागता आलं पाहिजे. अमेरिकेत आम्हाला सहज फिरता यायचं पण, भारतात हे शक्य नाही.” असं डॉ. नेनेंनी सांगितलं.

अमेरिका सोडून भारतात परतल्यावर जास्त आनंदी आहात का? यावर नेने म्हणाले, “मी इथे जास्त आनंदी आहे असं म्हणू शकत नाही कारण, अमेरिकेत ओळख लपवून सहज वावरता यायचं. कुठेही फिरण्याचं स्वातंत्र्य होतं, तिथे सगळीच लोक आम्हाला ओळखत नव्हती. पण, भारतात असं नाहीये. आपल्या देशात माधुरीमुळे मलाही सगळे ओळखतात…इथे सगळी आपली लोक आहेत आणि भारतीय संस्कृती सर्वात छान आहे.”