‘हम आपके हैं कौन’, ‘प्रहार: द फायनल अटॅक’, ‘मोहब्बत’, ‘दिल तो पागल है’, ‘पुकार’, ‘वजूद’, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ ते ‘भूल भूलैय्या-३’ अशा अनेक चित्रपटांतून अभिनेत्री माधुरी दीक्षित(Madhuri Dixit)ने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अभिनयाबरोबरच अभिनेत्री तिच्या अनेक गाजलेल्या गाण्यांसाठी ओळखली जाते. ‘धकधक गर्ल’ म्हणूनही अभिनेत्रीची ओळख आहे. माधुरी दीक्षितचे ‘एक-दो-तीन’ हे गाणेदेखील चांगलेच गाजले होते. आता अभिनेत्रीने या गाण्याचा रिमेक कोणती अभिनेत्री करू शकते, यावर वक्तव्य केले आहे.

माधुरी दीक्षित म्हणाली…

आयफा पुरस्कार सोहळ्याच्या ग्रीन कार्पेटवर अभिनेत्रीने केलेले वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे. माधुरी म्हणाली, “आताच्या तरुण पिढीमधील मला राशा थडानी खूप आवडते. ती उत्तम डान्स करते.” जेव्हा तिला विचारले की, ‘एक-दो-तीन’ या गाजलेल्या गाण्याला आज कोण न्याय देऊ शकते? तर, त्याचे उत्तर देताना अभिनेत्रीने राशाचे नाव घेतले.

१९८८ साली प्रदर्शित झालेल्या तेजाब या चित्रपटातील ‘एक-दो-तीन’ या गाण्याला मोठी लोकप्रियता मिळाली होती. एन, चंद्रा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. माधुरी दीक्षित अनिल कपूर हे प्रमुख भूमिकांत दिसले होते. टायगर श्रॉफ व जॅकलीन फर्नांडिस यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘बागी २’मध्ये हे गाणे एका नव्या रूपात ऐकायला मिळाले होते. हे गाणे अमिषा पटेलच्या ‘देसी मॅजिक’साठीसुद्धा बनवले गेले होते.

राशा ही रविना टंडनची मुलगी आहे. नुकतेच तिने बॉलीवूडमध्ये डेब्यूट केले आहे. तिचा आझाद हा चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात अजय देवगणही प्रमुख भूमिकेत दिसला होता; मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार कमाई करू शकला नाही. या चित्रपटाने ६.३५ कोटींची कमाई केली होती. अभिनेत्रीने उई अम्मा या गाण्यातून सर्वांचे लक्ष वेधले होते.

माधुरी दीक्षितबद्दल बोलायचे तर अभिनेत्री नुकतीच स्टार प्रवाह वाहिनीच्या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहिली होती. त्यामुळे ती मोठ्या चर्चेत आली होती. त्याबरोबरच ती ‘भूल भुलैय्या ३’मध्येही प्रमुख भूमिकेत दिसली होती. आता आगामी काळात ती कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.