‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित व डॉ. श्रीराम नेने यांच्या लग्नाला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. माधुरीने डॉ. नेनेंशी लग्न केल्यावर चित्रपटांमधून ब्रेक घेतला आणि अमेरिकेला गेली. तिथेच ती संसारात रमली. जवळपास एक दशक अमेरिकेत राहिल्यानंतर काही वर्षांपूर्वी ती व तिचे पती डॉ. नेने भारतात परत आले. माधुरीची मुलं आता मोठी झाली असून ती लॉस एंजेलिसमध्ये कॉलेजमध्ये आहेत.

डॉ. नेने यांनी त्यांच्या युट्यूब चॅनेलवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत माधुरीने तिची मुलं अरिन (वय २१) आणि रायन (१९) या दोघांबद्दल सांगितलं. तसेच अरिन व रायन दोघेही लहानपणापासून एकमेकांचे रक्षण करतात, असंही तिने नमूद केलं. यावेळी तिने एक प्रसंग सांगितला, जेव्हा तिच्या अडीच वर्षांच्या मुलाने आपल्या मोठ्या भावाबरोबर दादगिरी करणाऱ्या एका मुलाला विरोध केला होता.

डॉ. नेनेंच्या आईदेखील या चर्चेत सहभागी झाल्या होत्या. त्यांनी अरिन आणि रायन लहान असतानाचा काळ आठवला. तसेच अरिन रायनला कसा जपायचा, त्याबद्दल सांगितलं. त्या म्हणाल्या, “तो भाऊ रायनची खूप काळजी घ्यायचा. तो नेहमी म्हणायचा, ‘हा माझा भाऊ आहे, माझा धाकटा भाऊ आहे’. तो कुठेही गेला तरी तू (अरिन) त्याचे रक्षण करायचास,” असं त्या म्हणाल्या.

madhuri dixit family
माधुरी दीक्षित व तिचे कुटुंब (फोटो – इन्स्टाग्राम)

माधुरीने सांगितला किस्सा

माधुरी या चर्चेत म्हणाली की त्याला मोठा अरिन भाऊ जसा जपतो, तसंच तो रायनही त्याला जपतो. रायन लहान होता, त्यावेळी त्याने दादागिरी करून अरिनला त्रास देणाऱ्या मुलाला कसा विरोध केला ते माधुरीने सांगितलं. “मला आठवतंय, एकदा अरिनला फुटबॉल ग्राउंडवर एका मुलाने ढकललं होतं, तेव्हा रायन फक्त अडीच वर्षांचा होता. तो अरिनला धक्का देणाऱ्या मुलासमोर उभा राहिला आणि म्हणाला, ‘तू माझ्या भावाशी असं वागू शकत नाही. तुला माहीत आहे का मी कोण आहे? तो कोण आहे माहीत आहे का? तो माझा भाऊ आहे'”, असं माधुरीने सांगितलं. हे ऐकल्यावर रायन विनोद करत म्हणाला “आम्ही लहान असतानाच्या कोणत्याही गोष्टी सांगून आई-वडील आम्हाला मूर्ख बनवू शकतात.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, माधुरी भारतात परतल्यानंतर अभिनयक्षेत्रात आली. तिने अनेक रिअॅलिटी शो जज केले, तर डॉ. नेने त्यांच्या कामात व्यग्र असतात. अनेक इव्हेंट्स व पार्ट्यांना ते माधुरीबरोबर हजेरी लावतात. माधुरी दीक्षितच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती शेवटची ‘भुल भुलैया ३’ मध्ये दिसली होती. या चित्रपटात कार्तिक आर्यन, विद्या बालन, तृप्ती डिमरी हे कलाकार होते.