Madhuri Dixit : बॉलीवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित व तिचे डॉ. श्रीराम नेने यांचा लग्नसोहळा १९९९ मध्ये अमेरिकेत पार पडला होता. लग्नानंतर अभिनेत्रीने काही मोजक्या सिनेमांमध्ये काम केलं आणि त्यानंतर तिने बॉलीवूडमधून ब्रेक घेतला होता. डॉ. नेनेंशी लग्न झाल्यावर माधुरी आपल्या कुटुंबीयांसह अमेरिकेत अगदी सुखात आयुष्य जगत होती. जवळपास १० वर्षे अमेरिकेत राहिल्यावर ‘धकधक गर्ल’ने भारतात परतण्याचा निर्णय घेतला होता.
२०११ मध्ये माधुरी पतीसह भारतात आली. ‘धकधक गर्ल’च्या कमबॅकनंतर तिच्या सगळ्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. भारतात आल्यावर माधुरीने पुन्हा एकदा तिचा सिनेविश्वातील प्रवास सुरू केला. याशिवाय अनेक डान्स शोजमध्ये अभिनेत्रीने परीक्षक म्हणून जबाबदारी देखील सांभाळली.
मात्र, बॉलीवूडमध्ये पुनरागमन करण्यासाठी माधुरी भारतात परतली नव्हती. तिचं अमेरिका सोडून मायदेशी परतण्याचं कारण वेगळंच होतं. याबाबत माधुरीने स्वत: खुलासा केला आहे.
माधुरीने स्क्रीनला ( इंडियन एक्स्प्रेस ) दिलेल्या मुलाखतीत याबद्दल खुलासा केला आहे. अभिनेत्री सांगते, “माझे आई-बाबा माझ्याबरोबर अमेरिकेत राहत होते. त्यांचंही वय झालं होतं आणि त्यांना आपल्या देशात परत यायचं होतं. त्यामुळे आम्ही मायदेशी परत येण्याचा विचार केला. याशिवाय माझ्या मुलांनाही आपली संस्कृती समजेल हे सुद्धा मला जाणवलं… आपल्या लोकांमध्ये मनाची श्रीमंती आहे, कोणत्याही परिस्थितीत आनंदी कसं राहायचं हे आपल्या देशातील लोकांकडून शिकायला मिळतं.”
माधुरी पुढे म्हणाली, “माझ्या आई-बाबांनी भारतात परत जायचं असं मला सांगितल्यावर मग, आम्हालाही असं वाटलं… अरे जायला काय हरकत आहे? आमची मुलं सुद्धा आपल्या देशातील संस्कृती, भारतातील विविध गोष्टी अनुभवू शकतात. कारण, परदेशात आपण एका कोशात वावरत असतो पण, इथे असं नाहीये. आपल्या देशात अनेक गोष्टी समजून घेता येतात. याशिवाय माझं सगळं काम भारतातच होतं. त्यात माझ्या नवऱ्यालाही इथे काही नवीन गोष्टी सुरू करायच्या होत्या. त्यामुळे विचार करून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. पण, मुळात ही कल्पना माझ्या आई-बाबांमुळेच आली.”
दरम्यान, भारतात परतल्यावर माधुरी दीक्षित २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटातील ‘घागरा’ गाण्यात झळकली होती. यामध्ये ‘धकधक गर्ल’ने अभिनेता रणबीर कपूरसह जबरदस्त डान्स केला होता.