Madhuri Dixit Son Arin Nene : ९० च्या दशकातील ‘लेडी सुपरस्टार’ म्हणून माधुरी दीक्षितला ओळखलं जातं. ‘तेजाब’, ‘राम लखन’, ‘खलनायक’, ‘हम आपके हैं कौन’, ‘दिल तो पागल है’ अशा असंख्य गाजलेल्या चित्रपटांमध्ये ‘धकधक गर्ल’ महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकली आहे. करिअरच्या शिखरावर असताना माधुरीने लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता. अभिनेत्रीने १९९९ मध्ये डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केलं. या दोघांचा लग्नसोहळा अमेरिकेत पार पडला होता.
माधुरी दीक्षितला दोन मुलं आहेत. तिच्या मोठ्या मुलाचं नाव अरिन आहे तर, धाकट्या मुलाचं नाव रायन असं आहे. अभिनेत्रीचा मोठा मुलगा नुकताच पदवीधर झाला आहे. यानिमित्ताने लाडक्या लेकाचं कौतुक करताना डॉ. श्रीराम नेनेंनी खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये माधुरी आणि तिचे पती डॉ. नेने हे दोघंही अरिनच्या कॉलेजमध्ये त्याला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे.
अरिन नेने याने दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठातील ‘विटेर्बी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग’मधून कॉम्प्युटर सायन्स अँड बिझनेस या विषयात पदवी मिळवली आहे. डॉ. नेने अरिनच्या कॉलेजमधील व्हिडीओ शेअर करत लिहितात, “अरिन नेने… ‘विटेर्बी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग’मधून पदवीधर झाला आहे. पदवीधर झालेल्या सगळ्या मुलांना खूप शुभेच्छा आणि कॉलेजमधील प्राध्यापकांचे खूप खूप आभार… त्यांनी घेतलेली मेहनत, परिश्रम यामुळे या कॉलेजमधील सगळ्याच मुलांनी यशाचा एवढा मोठा टप्पा गाठला आहे.”
तसेच माधुरी लेकाबद्दल म्हणते, “मला अरिनचा खूप जास्त अभिमान वाटतोय… आज कॉलेजमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी खूप सुंदर सोहळा आयोजित करण्यात आला होता. माझ्या अरिनला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा”
दरम्यान, माधुरी दीक्षितच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर लवकरच ती ‘मिसेस देशपांडे’ या सिनेमात झळकणार आहे. ‘धकधक गर्ल’ने गेल्यावर्षी कार्तिक आर्यनच्या ‘भुल भुलैय्या ३’ मध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. यामध्ये तिने साकारलेल्या भूमिकेचं आणि विशेषत: ‘धकधक गर्ल’च्या नृत्य सादरीकरणाचं सर्वत्र कौतुक झालं होतं. या सिनेमात माधुरी आणि विद्याच्या डान्सची जुगलबंदी पाहायला मिळाली होती.