Marathi Actor richer than Bobby Deol: मनोरंजनसृष्टीत असे काही कलाकार आहेत, ज्यांनी विविध माध्यमांत काम केले आहे. अभिनेता शरद केळकर अशाच कलाकारांपैकी एक आहे. मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, मालिका, वेब सीरिजमध्ये काम केले आहे. इतकेच नाही, तर अभिनेत्याने व्हॉइसओव्हर आर्टिस्ट म्हणूनदेखील काम केले आहे.
टीव्ही आणि चित्रपटांतील त्याच्या भूमिकांना मोठी पसंती मिळताना दिसली. मात्र, हे यश अभिनेत्याला सहज मिळाले नाही. त्याला संघर्ष करावा लागला. एक वेळ अशीही आली होती की, त्याच्या बँक खात्यात काहीच पैसे नव्हते. तसेच, त्याच्यावर कर्जदेखील होते.
बॉबी देओलपेक्षाही श्रीमंत आहे मराठमोळा अभिनेता
आता मात्र, अभिनेता कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे. शरद केळकरची संपत्ती बॉलीवूड अभिनेता बॉबी देओलपेक्षाही अधिक आहे. शरद केळकरची संपत्ती किती आहे ते जाणून घेऊयात…
हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, बॉबी देओलची संपत्ती ७० कोटी आहे; तर शरद केळकरची संपत्ती ७५ ते ८० कोटींच्या दरम्यान आहे. शरद केळकरच्या कामाबद्दल बोलायचे, तर तो सध्या हिंदी टीव्ही शो तुम से तुम तक या कार्यक्रमात प्रमुख भूमिकेत दिसत आहे. या टीव्ही मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
रिपोर्टनुसार शरद एका एपिसोडसाठी ३.५ लाख इतके मानधन घेतो. इतके मानधन घेतल्याने सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांपैकी तो एक ठरला आहे. तुम से तुम तक या मालिकेतून अभिनेत्याने आठ वर्षांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन केले.
शरदच्या कामाबद्दल बोलायचे, तर अभिनेत्याने २००१ मध्ये टीव्ही मालिकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. तो भाभी, रात होने को है, सीआयडी, सिंदूर तेरे नाम का, नच बलिए-२, साथ फेरे – सलोनी का सफर, पत्नी पत्नी और वो, कॉमेडी सर्कस, बॅरी पिया व कुछ तो लोग कहेंगे यांसारख्या मालिका आणि रिअॅलिटी शोमध्ये तो दिसला. त्याच्या भूमिकांना चांगली पसंती मिळाली.
मालिकांबरोबरच अभिनेता ‘गोलियों की रासलीला राम-लीला’, ‘भूमी’, ‘हाऊसफुल ४’, ‘भेडिया’, ‘चोर निकलकर भागा’, ‘लक्ष्मी, हर हर महादेव, स्काय फोर्स, दिल दोस्ती आणि कुत्ते यांसारख्या चित्रपटांमध्ये तो दिसला आहे.
शरद केळकर हा त्याच्या आवाजासाठी ओळखला जातो. जेव्हा बाहुबली चित्रपट हिंदीमध्ये डब करण्यात आला. त्यावेळी प्रभासच्या भूमिकेसाठी शरदने आवाज दिला होता. त्याच्या या आवाजामुळे त्याला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. त्याच्या आवाजाचे कौतुक झाले.
आता अभिनेता आगामी काळात कोणत्या भूमिकेतून, चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.