दाक्षिणात्य चित्रपट आणि बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची जादू पसरवणारे सुपरस्टार म्हणजे रजनीकांत. त्यांचे जगभरात असंख्य चाहते आहेत. त्यांचा पडद्यावरील अभिनय, डायलॉग बोलण्याची शैली, चालण्याची स्टाईल याचे लाखो चाहते आहेत. रजनीकांत यांनी गेल्या अनेक वर्षांपासून ‘रोबोट’, कबाली’, ‘शिवाजी’, ‘अन्नाते’ आणि ‘लिंगा’ यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे. आता नुकतंच त्यांच्या ‘लिंगा’ या चित्रपटाबद्दल एका लोकप्रिय मराठी अभिनेत्री आणि डबिंग आर्टिस्टने खुलासा केला आहे.
‘लिंगा’ हा चित्रपट २०१४ मध्ये प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात अभिनेते रजनीकांत, अनुष्का शेट्टी, सोनाक्षी सिन्हा हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते. हा चित्रपट हिंदी भाषेतही डब करण्यात आला होता. या चित्रपटातील अभिनेत्री अनुष्का शेट्टीसाठी एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने डबिंग केले होते.
आणखी वाचा : शिवाजी साटम यांची सून आहे प्रसिद्ध अभिनेत्री, सासऱ्यांबद्दल खुलासा करत म्हणाली “लग्नानंतर त्यांनी…”
लोकप्रिय डबिंग आर्टिस्ट म्हणून नावाजलेली अभिनेत्री मेघना एरंडेने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने रजनीकांत यांच्या लिंगा चित्रपटाचा उल्लेख केला आहे. यावेळी तिने या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनसाठी अभिनेत्री अनुष्का शेट्टीला आवाज दिला आहे, असे सांगितले.
“मी रजनीकांत सरांची खूप मोठी चाहती आहे. मी जेव्हा लिंगा चित्रपटात अनुष्का शेट्टीसाठी डबिंग करत होते, तेव्हा अनेकदा मला त्यांना पाहून माझे डायलॉग विसरायला व्हायचे. मला नुकतंच जिओ सिनेमावर हा व्हिडीओ मिळाला.
साधारणपणे मी स्वत: डब केल्यानंतर प्रदर्शित झालेला चित्रपट सहसा पाहत नाही. पण हा चित्रपट खूप खास होता. रजनी सर तुम्ही बेस्ट आहात”, असे तिने तिच्या या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान के एस रविकुमार दिग्दर्शित ‘लिंगा’ हा चित्रपट चांगलाच सुपरहिट ठरला होता. सुपरस्टार रजनीकांत, सोनाक्षी सिन्हा आणि अनुष्का शेट्टी यांची या चित्रपटात प्रमुख भूमिका होती. ‘लिंगा’ हा चित्रपट रजनीकांत यांच्या अॅक्शन स्टाईलसाठी ओळखला जातो. या चित्रपटाचे बजेट १०० कोटी रुपये होते.