Veteran Marathi Actress insulted Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यांना इंडस्ट्रीत बिग बी म्हणूनही संबोधलं जातं. परंतु, इंडस्ट्रीमध्ये मोठं नाव असलेल्या अमिताभ यांचा एकदा एका चित्रपटाच्या सेटवर लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्रीने अपमान केला होता.
‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, ‘शहेनशहा ‘ चित्रपटाच्या सेटवर मराठमोळ्या अभिनेत्रीने अमिताभ यांना थेट त्यांचं काम न आवडल्याचं सांगत अपमान केला होता. या अभिनेत्री म्हणजे रोहिणी हट्टंगडी. रोहिणी यांनी आजवर त्यांच्या सहज सुंदर अभिनयाने अनेकांची पसंती मिळवली आहे.
रोहिणी हट्टंगडी यांनी आजवर अनेक मराठी, हिंदी चित्रपटांत काम केलं आहे. परंतु, त्यांच्या कारकिर्दीत काहीवेळा वाट्याला त्यांच्या वयापेक्षा मोठ्या किंवा आईच्या भूमिका आल्या. ‘शहेनशहा ‘ चित्रपटातसुद्धा त्यांनी अमिताभ यांच्या आईची भूमिका केलेली. खऱ्या आयुष्यामध्ये रोहिणी हट्टंगडी अमिताभ यांच्यापेक्षा वयाने लहान आहेत.
रोहिणी यांनी एका मुलाखतीमध्ये अमिताभ यांच्याबरोबर काम करण्याचा व त्यांच्या पहिल्या भेटीचा अनुभव सांगितला आहे. त्यांनी ‘फ्रायडे टॉकिज’ला मुलाखत दिली होती. यामध्ये त्यांना अमिताभ यांच्यासह काम करण्याच्या अनुभवाबद्दल विचाण्यात आलं. हा अनुभव सांगत त्या म्हणाल्या, त्यांनी या चित्रपटात अमिताभ यांच्या आईची भूमिका साकरण्यास होकार दिल्यानंतर, त्यांच्यासह काम करण्यापूर्वी त्यांच्या मनात बिग बींविषयी भीती होती.
रोहिणी यांनी पुढे सांगितलं, सेटवर गेल्यानंतर त्या त्यांची सहकलाकार सुप्रिया पाठक यांच्यासह अमिताभ यांच्या येण्याची वाट पाहत होत्या. सुप्रिया यांनी या चित्रपटात शहिदा ही भूमिका साकरलेली आणि त्यांनी काही दिवसांपूर्वीच अमिताभ यांच्यासह काम केलं होतं, त्यामुळे त्या दोघांची चांगली ओळख झाली होती. यानंतर अमिताभ बच्चन सेटवर आले आणि त्या दोघी सीनसाठी त्यांची वाट पाहत असताना अमिताभ सुप्रिया यांना म्हणाले, “बघ त्यांनी मला कसे कपडे दिले आहेत.”
रोहिणी हट्टंगडी याबाबत पुढे म्हणाल्या, “मला माहीत नाही माझ्या मनात नेमकं काय आलं, पण मी त्यांना कुठल्याही क्षणांचा विलंब न करता ‘लावारिस’मध्ये तुम्ही जे काम केलं त्याच्यासमोर हे काहीच नाहीये असं म्हणाले. तेव्हा मी सुप्रियाकडे बघत मनात विचार केला हे मी काय केलं. पण, अमिताभ बच्चन यावर काहीच न बोलता तिथून निघून गेले, त्यामुळे नंतर बराच वेळी मी द्विधा मनस्थितीत होते.”
रोहिणी पुढे म्हणाल्या, “नंतर माझ्या मनामध्ये अनेक विचार सुरू होते. जर अमिताभ मला काही म्हणाले तर मी काय करू, ते काय म्हणतील, या विचाराने मी अस्वस्थ झाले होते. परंतु, अमिताभ काहीच म्हणाले नाहीत, त्यांनी जणू काही झालंच नाही असं दाखवलं. मला असं वाटतं यामुळेच ते अमिताभ बच्चन आहेत.”
रोहिणी हट्टंगडी यांनी या मुलाखतीमध्ये त्यांना ‘लावारिस’ चित्रपटातील अमिताभ यांचं काम आवडलं नसल्याचं सांगितलं आहे. यापूर्वीच्या काही चित्रपटांमधील त्यांचं कामसुद्धा रोहिणी यांना आवडलं नव्हतं. त्या म्हणाल्या, “‘लावारिस’मधील अमिताभ यांचं काम मला त्यांच्या तोडीचं वाटलं नाही, पण तरी त्यांनी त्यांचा अपघात झाल्यानंतरही दिग्दर्शकांना शब्द दिल्याने सर्व चित्रपटांमध्ये काम केलं.”