Aditya Sarpotdar Scary Experience : मराठीतले अनेक कलाकार आता हिंदी सिनेसृष्टीत काम करत आहेत. अनेक मराठी दिग्दर्शकांनीही हिंदीत काही हिट सिनेमे दिले आहेत. अशा हिट हिंदी सिनेमे देणाऱ्या काही दिग्दर्शकांपैकी एक लोकप्रिय दिग्दर्शक म्हणजे आदित्य सरपोतदार. ‘उलाढाल’, ‘क्लासमेट’, ‘माऊली’, ‘उनाड’, ‘नारबाची वाडी’, ‘फास्टर फेणे’, ‘झोंबिवली’सारखे अनेक हिट मराठी सिनेमे केल्यानंतर आदित्य सरपोतदारने आपल्या दिग्दर्शनाचा मोर्चा हिंदी सिनेमांकडे वळवला.

गेल्यावर्षी त्याचा ‘मुंज्या’ हा हॉरर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता आणि या सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. आदित्य सरपोतदारनं केलेला हा हॉरर सिनेमा प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. याच ‘मुंज्या’चं शूटिंग करताना आदित्य सरपोतदारला प्रत्यक्षातही भीतीदायक अनुभव आला होता. बोलभिडूबरोबरच्या संवादात त्यानं स्वत:चा हा अनुभव शेअर केला आहे.

याबद्दल आदित्य सांगतो, “‘मुंज्या’साठी आम्ही कोकणातील गुहागरमध्ये शूटिंग करत होतो. तर तिथे एका रिसॉर्टमध्ये आमची एक टीम होती. सगळ्या डिपार्टमेंट्सचे हेड तिकडे राहायला होते. आम्ही तिथे सात-आठ दिवस राहिलो. पहिल्या मध्यरात्री मला जाग आली. गरम होत होतं म्हणून एसी चेक केला, तो बंद होता म्हणून मी पुन्हा एसी लावून झोपलो. दुसऱ्या दिवशीही मला जाग आली, तेव्हा मी वेळ पाहिली तर रात्रीचे ३ वाजले होते. पुन्हा मला वाटलं एसीचा प्रॉब्लेम आहे; त्यामुळे मला जाग येत असावी. सामान्यत: मी रात्री कधीच उठत नाही. शूटिंग असेल तर दमल्यामुळे जाग येत नाहीच. पण, इतरवेळीही मला कधीच जाग येत नाही.”

पुढे आदित्य म्हणाला, “मग तिसऱ्या दिवशी आम्ही सगळे नाश्त्यासाठी जमलो तेव्हा याबद्दल चर्चा झाली. याबद्दल अॅक्शन डिरेक्टरबरोबर माझं बोलणं सुरू होतं. त्यावर तोही हेच म्हणाला की, त्याच्याबरोबरही हेच होत आहे आणि तोही ३ वाजताच झोपेतून उठत आहे. तेव्हा आम्हाला वाटलं की, कदाचित रात्री लाईटचा काही प्रॉब्लेम असावा म्हणून हे होतंय. मग याबद्दल आम्ही त्या रिसॉर्टच्या मॅनेजरला सांगितलं. तर तो म्हणाला, असं काहीच नाही. त्या रात्री पुन्हा माझ्याबरोबर ते घडलं. मला रात्री ३ वाजता जाग आली. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा अॅक्शन डिरेक्टरला विचारलं तर तोही हो म्हणाला.”

१५-२० जणांनी त्यांच्याबरोबरसुद्धा हे घडलं असं सांगितलं

यानंतर आदित्यने सांगितलं, “आमचं बोलणं ऐकून बाजूला बसलेला कॅमेरामननेही त्याचा सेम अनुभव सांगितला. मग आम्ही सगळ्यांना याबद्दल विचारलं, तर २० पैकी १५-२० जणांनी त्यांच्याबरोबरसुद्धा हे घडलं असं सांगितलं. तेव्हा जाणवलं की काहीतरी प्रॉब्लेम असणारच, जेणेकरून एकाच वेळी सगळ्यांनाच जाग येतेय. काहीच होत नव्हतं, तरी लोकांना रात्री ३ वाजता जाग यायची. तेव्हापासून मला याचं उत्तर मिळालं नाहीय की त्या रात्री नेमकं काय होत होतं.”

यापुढे त्याने म्हटलं की, “आम्ही रात्री अचानक झोपतून उठण्याच्या सगळ्या शक्यता तपासून पाहिल्या. पण, तरी एकाच वेळी रात्री अचानक जाग का येत होती याबद्दल काहीच कळलं नाही. नंतर आम्ही तिथून निघणारच होतो, पण शूटिंगसाठी दोन दिवस शिल्लक होते, त्यामुळे आम्ही ते शूटिंग पूर्ण करून तिथून निघण्याचा निर्णय घेतला.”