ही गोष्ट आहे त्या अभिनेत्रीची, जिने अनेक सुपरस्टार्सबरोबर काम केलं, करिअरमध्ये प्रचंड यश मिळवलं. व्यावसायिक आयुष्यात प्रचंड यश मिळवणाऱ्या या अभिनेत्रीला वैयक्तिक आयुष्यात मात्र एकटेपणा नशिबी आला. ज्याच्यावर तिचं प्रेम होतं, त्याच्याशी साखरपुडा केला, पण लग्नाआधीच त्याचं निधन झालं अन् तिने विधवेसारखं जगणं स्वीकारलं.

या अभिनेत्रीने तिच्या करिअरमध्ये ९० हून जास्त चित्रपट केले. दिसायला अत्यंत सुंदर असलेली ही अभिनेत्री दिलीप कुमार यांची पत्नी सायरा बानो यांची खास मैत्रीण होती. सायरा बानो या अभिनेत्रीला आपल्या घरातील सदस्य म्हणायच्या. ही अभिनेत्री आता हयात नाही. २०१४ मध्ये ७५ व्या वर्षी या अभिनेत्रीचं निधन झालं. या अभिनेत्रीचं नाव नंदा.

मराठी कुटुंबात जन्म अन् करिअरची सुरुवात

नंदाचं खरं नाव नंदिनी कर्नाटकी होतं. तिचा जन्म ८ जानेवारी १९३९ रोजी कोल्हापुरात झाला होता. तिला नंदा नावाने लोकप्रियता मिळाली. नंदाने हिंदी तसेच मराठी चित्रपटात काम केलं होतं. नंदाचं कुटुंब मराठी होतं. तिचे वडील मराठी अभिनेते व चित्रपट निर्माते होते. तिचे भाऊ सिनेमॅटोग्राफर होते. नंदा ७ वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिघडली, त्यानंतर नंदाने बालकलाकार म्हणून चित्रपटांमध्ये काम सुरू केलं.

नंदाचे चित्रपट

नंदाने १९४८ मध्ये मंदिर चित्रपटातून पदार्पण केलं. तिने १९४८ ते १९५६ या काळात बालकलाकार म्हणून काम केलं. नंतर तिला तिचे नातेवाईक व्ही शांताराम यांनी तिला मोठी संधी दिली. तिला ‘तूफान और दीया’ सिनेमात घेतलं. नंतर तिने ‘भाभी’ नावाचा चित्रपट केला. नंतर ती मुख्य भूमिका करू लागली. ‘छोटी बहन’, ‘हम दोनों’, ‘कानून’, ‘आंचल’, ‘जब जब फूल खिले’, ‘आशिक’, ‘बेटी’, ‘इत्तेफाक’, ‘शोर,’ ‘उम्मीद’, ‘भाभी’, ‘परिणीता’, ‘प्रेम रोग’ हे तिचे गाजलेले चित्रपट आहेत.

मनमोहन देसाईंच्या प्रेमात पडली नंदा

चित्रपटांमध्ये करिअर हिट झाल्यावर नंदा दिग्दर्शक व निर्माते मनमोहन देसाईंच्या प्रेमात पडली. देसाई विवाहित होते. त्यांचं लग्न जीवनप्रभाशी झालं होतं. जीवनप्रभा यांचं १९७९ मध्ये निधन झालं. एकदा नंदाचे भाऊ जयप्रकाश यांनी तिच्या व मनमोहनच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितलं होतं. वहीदा रहमान यांनी यांच्या प्रेमकहाणीत महत्त्वाची भूमिका बजावली होती. वहीदा यांनी डिनरचा प्लॅन केला आणि नंतर नंदा व मनमोहन यांना एकटं सोडून त्या निघून गेल्या. त्यानंतर मनमोहन यांनी नंदा यांच्यासमोर आपल्या भावना व्यक्त केल्या.

actress nanda personal life
अभिनेत्री नंदा (फोटो – इंडियन एक्सप्रेस)

मनमोहन यांनी अगदी साधेपणाने नंदाला मागणी घातली. तिने विचार केला आणि नंतर वहीदा रहमानला फोन करून मनमोहन यांना लग्नासाठी होकार दिला, असं जयप्रकाश यांनी सांगितलं होतं. त्यानंतर मनमोहन देसाई व नंदा यांचा साखरपुडा झाला. मात्र साखरपुड्यानंतर दोन वर्षांनी मनमोहन यांचं निधन झालं. या घटनेचा नंदाला मोठा धक्का बसला.

विधवा महिलेसारखं जगली नंदा

नंदाचे भाऊ जयप्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनमोहन यांच्या निधनानंतर नंदा विधवेसारखं आयुष्य जगू लागली. ‘ताईला मोठा धक्का बसला. तिने कधीच रंगीत कपडे घातले नाही. ती म्हणायची मी त्यांना पती मानलंय, ते नेहमी माझे पती राहतील,’ असं जयप्रकाश म्हणाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नंदाने मनमोहन यांच्या निधनानंतर फक्त पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले. मनमोहन यांच्य निधनानंतर तिने स्वतःला जणू कैद करून घेतलं. ती कोणालाच भेटायची नाही, तिने थिएटरला जाणं सोडलं. तिला डायमंड फार आवडायचे, पण मनमोहन यांच्या निधनानंतर तिच्या सगळ्या इच्छा मेल्या. ‘आयुष्यात आता काय उरलंय’, असं नंदा म्हणायची, अशी माहिती तिच्या भावाने दिली होती.