प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता आणि अभिनेता सत्यदीप मिश्रा यांनी २७ जानेवारी २०२३मध्ये लग्नगाठ बांधली. भव्य लग्नसोहळा न ठेवता या कपलने कुटुंबातील काही सदस्य आणि जवळच्या मित्र-मैत्रिणींना आमंत्रित करून कोर्ट मॅरेज केलं होतं. लग्नाच्या एका वर्षानंतर आता या कपलने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे.

आज (१८ एप्रिल २०२४) मसाबा आणि सत्यदीप मिश्राने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत दोघं लवकरच आई-बाबा होणार असल्याची बातमी जाहीर केली. या पोस्टमध्ये पहिल्या फोटोत गरोदर असलेल्या महिलेचा इमोजी वापरला आहे. तर दुसऱ्या फोटोत मसाबा आणि सत्यदीपसारखे दिसणारे इमोजी वापरले आहेत. तिसऱ्या फोटोत होणाऱ्या बाळाच्या आई-बाबांचा ब्लॅक अ‍ॅंड व्हाईट फोटो शेअर केला आहे.

हेही वाचा… ‘या’ मराठमोळ्या नृत्यदिग्दर्शकाला मिळाली संजय लीला भन्साळींबरोबर काम करण्याची संधी; म्हणाला, “माझे अश्रू अनावर…”

या खास पोस्टला कॅप्शन देत मसाबाने लिहिलं, “आमच्या आयुष्यात येण्यासाठी दोन इवल्याशा पायांची वाटचाल सुरू झाली आहे. कृपया प्रेम, आशीर्वाद आणि केळ्याचे वेफर्स पाठवा” “हॅशटॅग- लवकरच एक लहान बाळ येणार आहे. आईबाबा” असं हॅशटॅग मसाबाने वापरलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मसाबा गुप्ता आणि सत्यदीप मिश्रा यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगायचं झालं तर, मसाबा गुप्ताचं पहिलं लग्न निर्माते मधु मंतेना यांच्याशी झालं होतं. २०१५ मध्ये त्यांचं लग्न झालं आणि २०१९ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. तर सत्यदीप मिश्राचंही हे दुसरं लग्न आहे. सत्यदीप मिश्राचं आणि अभिनेत्री अदिती राव हैदरी यांचं लग्न झाल्याची बातमी समोर आली होती. तथापि, त्या दोघांनी कधीही वैवाहिक स्थितीबद्दल भाष्य केलं नाही. २०१३ मध्ये अदितीने खुलासा केला होता की ते दोघं वेगळे झाले आहेत.