लोकप्रिय गायक मिका सिंग(Mika Singh) हा त्याच्या गाण्यांसाठी ओळखला जातो. आता मात्र मिका सिंग त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. २०२० मध्ये एका वेब सीरिजच्या माध्यमातून त्याने निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले होते. ‘डेंजरस’ असे या वेब सीरिजचे नाव असून, त्यामध्ये बिपाशा बासू व तिचा पती करण सिंग ग्रोव्हर प्रमुख भूमिकांत होते. आता मिका सिंगने या कलाकार जोडप्याबरोबर काम करण्याचा अनुभव भयानक होता, असे वक्तव्य केले आहे.

त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव भयंकर…

मिंका सिंगने नुकतीच कडक या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने या प्रोजेक्टबद्दल बोलताना म्हटले, “मला करण सिंग ग्रोव्हर व एका नवीन मुलीला यामध्ये कास्ट करायचे होते; जेणेकरून माझ्या बजेटमध्ये हा प्रोजेक्ट पूर्ण होईल आणि आम्ही काहीतरी चांगले निर्माण करू शकू. पण, अचानक यामध्ये बिपाशा बासू आली आणि त्यांनी म्हटले की, या सीरिजमध्ये आम्ही दोघेही काम करू. त्यांनी बजेट वाढवले नाही; मात्र त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव भयंकर होता.”

मिका सिंगने सांगितले की, बिपाशा बासू व करण सिंग ग्रोव्हर यांनी अशा अनेक गोष्टी केल्या, ज्यामुळे तीन महिन्यांचे शूटिंग सहा महिन्यांपर्यंत पुढे वाढले आणि त्यामुळे माझे पैसे वाया गेले. मिका सिंगने म्हटले, “मी एक महिन्यासाठी ५० जणांची टीम लंडनला घेऊन गेलो. ते शूटिंग दोन महिन्यांपर्यंत वाढले. करण व बिपाशाने खूप नाटक केले. ते लग्न झालेले जोडपे असल्यामुळे मी त्यांच्यासाठी एक रूम बुक केली; पण त्यांनी वेगवेगळ्या खोल्या मागितल्या. मला त्यामागचे लॉजिक समजले नाही. त्यांनी दुसऱ्या हॉटेलमध्ये राहण्याची मागणी केली. आम्ही तेसुद्धा केले.”

याबद्दल अधिक बोलताना मिका सिंगने म्हटले, “आम्ही जेव्हा स्टंट सीन शूट करrत होतो, त्यावेळी करणचा पाय फ्रॅक्चर झाला. चित्रपटाचे डबिंग करतानासुद्धा त्यांनी खूप अडचणी तयार केल्या. घसा खवखवत असल्यासारख्या सबबी त्यांनी सांगितल्या. त्यांना त्यांच्या कामाचे पैसे दिले गेले होते. तरीही त्यांनी का नाटक केले, हे मला समजले नाही. चित्रपटाच्या करारावर सह्या करताना त्यावर स्पष्टपणे स्क्रिप्टमध्ये ‘किसिंग सीन’ असल्याचे लिहिले होते. मात्र, पती-पत्नी असूनही त्यांनी स्क्रीनवर किसिंन सीन करण्यासाठी नकार दिला. हे कलाकार धर्मा प्रॉडक्शन, यशराज फिल्म यांसारख्या मोठ्या प्रॉडक्शन निर्मात्यांच्या पाया पडतात. अगदी छोट्या भूमिकेसाठीदेखील त्यांचे कौतुक करतात. पण जेव्हा गोष्ट छोट्या निर्मात्यांची असते, त्यावेळी या कलाकारांचा दृष्टिकोन बदलतो. आम्ही पैसे खर्च करत नाही का?”

मिका सिंगने म्हटले, “या अनुभवाने चित्रपट निर्मिती हे क्षेत्र पूर्णपणे सोडण्यास भाग पाडले. मी आता चित्रपट निर्मिती न करण्याचा निर्णय घेतला आहे आणि मी इतरांनाही तसा सल्ला देतो. जर कोणी चित्रपट निर्मितीचा विचार करीत असेल, तर नवीन कलाकारांना संधी द्या.”

याच मुलाखतीत मिका सिंगने अक्षय कुमार व सलमान खानने चित्रपट निर्मिती न करण्याबाबत सावधगिरीचा इशारा दिला होता, असे सांगितले. त्याबरोबरच त्या दोघांचे न ऐकल्याचा पश्चात्ताप झाल्याचेही मिका सिंगने म्हटले. कारण- या सीरिजमध्ये गायकाने पैशांची खूप मोठी गुंतवणूक केली होती आणि हा प्रोजेक्ट अयशस्वी ठरला.

हेही वाचा: Shweta Tiwari : “श्वेता तिवारी मला दांडक्याने मारायची आणि…”, विभक्त पतीने केले होते गंभीर आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बिपाशा बासू व करण सिंग ग्रोव्हर यांच्याबद्दल बोलायचे, तर हे दोघे २०१५ ला ‘अलोन’ या चित्रपटाच्या सेटवर भेटले. २०१६ ला त्यांनी लग्नगाठ बांधली आणि २०२२ ला त्यांना मुलगी झाली. तिचे नाव देवी, असे आहे. अभिनेत्री अनेकदा तिच्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करीत असते.