Mira Kapoor felt Isolated After Marriage : बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा कपूर अनेकदा चर्चेचा विषय बनतात. सोशल मीडियावरदेखील मीरा कपूर सक्रिय असल्याचे दिसते. आता एका मुलाखतीत शाहिद कपूरबरोबर लग्न झाल्यानंतर तिच्या आयुष्यात काय बदल झाले, याबद्दल तिने वक्तव्य केले आहे.
मीरा कपूर काय म्हणाली?
मीरा कपूरने नुकतीच नैना भान आणि साक्षी शिवदासानी यांच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत तिने वयाच्या २० व्या वर्षी शाहिद कपूरबरोबर लग्न झाल्यानंतर तिचे आयुष्य कसे बदलले, यावर वक्तव्य केले. मीरा कपूर म्हणाली की, त्या काळात मी एकटी होते. मी आणि माझ्या मैत्रिणी वेगवेगळ्या झालो. मला त्या काळात एकटेपणा वाटत होता, कारण आम्ही आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यात होतो.
पुढे मीरा म्हणाली की, तुम्ही आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यातून जात असता. जेव्हा तुम्ही तुमच्या मित्रांकडे बघता, त्यावेळी तुम्हाला वाटते की ते ज्या गोष्टी करत आहेत, त्या गोष्टी मलासुद्धा करता आल्या तर बरं झालं असतं. लग्न झाल्यानंतर मी माझ्या मित्र मैत्रिणींशी पूर्वीसारखं फारसे बोलतही नव्हते. त्यांचं म्हणणं असे की तुझं लग्न झालं आहे, म्हणजे तू आम्हाला विसरून जावं असं नाही. पण, सुदैवाने ती मैत्री टिकली. त्यांना माझी स्थिती आता कळत आहे, कारण आता त्या स्वत: त्या टप्प्यातून जात आहेत.
पुढे बॉलीवूडमधील गॉसिप तिला पती शाहिद कपूरकडून कळतात का यावर मीरा म्हणाली की बॉलीवूडमध्ये ज्या गोष्टी सुरू असतात, त्या मला शाहिदकडून कळतात असे अनेकांना वाटते, मात्र तसं नाही. शाहिदला कोणाच्या मागे बोलायला अजिबात आवडत नाही. मी त्याला विचारते की सध्या काय चालू आहे? तर तो मला माहीत नाही असं सांगतो. गॉसिप करण्यामध्ये त्याला अजिबात रस वाटत नाही.
पुढे ती म्हणाली की, अनेकदा माझ्याबद्दलही गॉसिप सुरू असतात. तेव्हा मला वाटते की हे कधीही झालेले नाहीये. त्यावेळी मी विचार करते की माझ्याबद्दल अशा प्रकारच्या चर्चा होत असतील तर बाकीच्या ९० टक्के गोष्टी या खोट्याच असू शकतात.
मीराने या मुलाखतीत स्पष्ट सांगितले की, जरी तिने एका बॉलीवूड स्टारबरोबर लग्न केलेले असले तरी तिला अनेकदा एकटेपणा जाणवतो. मित्र- मैत्रिणींपासून दुरावल्याची भावना तिच्या मनात येते. दरम्यान, मीरा व शाहिद कपूर यांनी २०१५ ला लग्नगाठ बांधली. त्यांना एक मुलगा व मुलगी आहे. शाहिद कपूर ‘बुल’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.