Helena Luke Passed Away: अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची पहिली पत्नी व अभिनेत्री हेलेना ल्यूक यांचे रविवारी (३ नोव्हेंबर रोजी) अमेरिकेत निधन झाले. नृत्यांगना आणि अभिनेत्री कल्पना अय्यर यांनी हेलेना यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली. हेलेना यांच्या निधनाचे कारण अस्पष्ट आहे.

हेलेना यांनी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम केलं होतं. १९८५ मध्ये आलेल्या ‘मर्द’ या चित्रपटात त्यांनी महत्त्वाची भूमिका केली होती हेलेना ल्यूक यांनी मिथुन चक्रवर्तींशी लग्न केलं होतं. मात्र अवघ्या चार महिन्यात त्यांचा घटस्फोट झाला होता.

हेलेना यांनी रविवारी सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी फेसबुकवर शेवटची पोस्ट केली होती. “विचित्र वाटतंय. मिश्र भावना आहेत, पण का ते माहीत नाही,” असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं होतं.

ते लग्न म्हणजे भयानक स्वप्न – हेलेना ल्यूक

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, एका जुन्या मुलाखतीत हेलेना यांनी मिथुनबरोबरच्या चार महिन्यांच्या लग्नाला धूसर स्वप्न म्हटलं होतं. स्टारडस्ट मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या, “मला नेहमी वाटतं की ते घडायलाच नको होतं. तोच माझ्यासाठी परफेक्ट आहे, असा विश्वास ठेवायला मला त्याने भाग पाडलं. दुर्दैवाने त्याला ते करण्यात यश आलं.” त्याकाळी घटस्फोटानंतर पुन्हा हेलेना आणि मिथुन परत एकत्र आल्याची चर्चा होती. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली होती. “तो सर्वात श्रीमंत माणूस असेल तरीही मी त्याच्याकडे परत जाणार नाही. मी पोटगी देखील मागितली नाही, ते एक भयानक स्वप्न होतं आणि ते संपलं आहे,” असं हेलेना म्हणाल्या होत्या.

हेही वाचा – बाबा अन् भावाला गमावलं, प्रचंड संघर्षानंतर अभिनेत्रीने २८ व्या वर्षी मुंबईत घेतलं हक्काचं घर, आईसह पूजा करताना झाली भावुक

मिथुन चक्रवर्तींबद्दल काय म्हणाल्या होत्या हेलेना?

याच मुलाखतीत हेलेना पुढे म्हणालेल्या, “जेव्हा त्याने मला म्हटलं की तो माझ्यावर प्रेम करतो, तेव्हा मी त्याच्यावर विश्वास ठेवला. पण त्याला नीट ओळखल्यावर मला समजलं की तो स्वतःशिवाय कोणावरही प्रेम करत नाही. तो खूप अपरिपक्व होता. मी त्याच्यापेक्षा वयाने खूप लहान होते तरीही मला वाटत होतं की मी मोठी आहे. तो खूप पझेसिव्ह होता आणि त्याने मला माझ्या एक्स बॉयफ्रेंडबरोबर पाहिल्याचा आरोप केला होता. मी तसं काहीच केलं नाही हे पटवून देण्याचा प्रयत्न करायचे, पण त्याचा काहीच फायदा व्हायचा नाही. त्याचा संशयी स्वभाव मी बदलू शकले नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हेलेना यांनी सोशल मीडियावर शेवटची पोस्ट टाकून प्रकृती बरी नसल्याची माहिती दिली होती.