Mithun Chakraborty was more succesful than Amitabh Bachchan: अभिनय, नृत्य आणि एकापेक्षा एक गाजलेले सिनेमे यासाठी अभिनेते मिथून चक्रवर्तींचे नाव घेतले जाते. मिथून चक्रवर्ती यांची प्रमुख भूमिका असलेले अनेक सिनेमे प्रचंड गाजले. त्यांच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.
आता बिहारमधील रूपबनी सिनेमा हॉलचे मालक विषेक चौहान यांनी बिहारमधील मिथून चक्रवर्ती यांच्या लोकप्रियतेवर वक्तव्य केले आहे. विषेक चौहान यांनी नुकतीच ‘डिजिटल कॉमेंट्री’ला मुलाखत दिली.
“मिथून चक्रवर्ती यांचा जो चित्रपट प्रदर्शित व्हायचा तो…”
या मुलाखतीत ते म्हणाले, “मिथून चक्रवर्ती हे दिग्गज अभिनेते आहेत. त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्या कामाबद्दल कोणी काहीही म्हटले तरी ते असे अभिनेते होते, जे आम्हाला महिन्याला दोन चित्रपट देत असत. ते खूप काम करत असत. त्यांची उटीमध्येदेखील इंडस्ट्री होती. त्यावेळी राज बब्बर हे प्रमुख निर्मात्यांपैकी एक होते. मिथून चक्रवर्ती यांचा जो चित्रपट प्रदर्शित व्हायचा, त्याला १०० टक्के गर्दी असायची. आम्हाला माहित असायचे की पुढचा आठवडा चांगला जाणार आहे.”
“मिथून चक्रवर्ती यांचे इतके चित्रपट असत की ते दाखविण्यासाठी स्क्रीन उपलब्ध नसत. त्यांचे अॅक्शन सिक्वेन्स लोकप्रिय ठरले होते. ‘चित्ता’, ‘रावण राज’, ‘संन्यासी मेरा नाम’, ‘मर्द’ आणि ‘हिटलर’सारखे चित्रपट सुपरहिट ठरले होते. मला आजही आठवते की एके दिवशी आम्ही ‘मर्द’ चित्रपट दाखवत होतो आणि पुढचा चित्रपट मिथुन यांचा होता. येणाऱ्या दोन चित्रपटांचे पोस्टर देखील त्यांच्याच चित्रपटांचे होते. भोजपुरी इंडस्ट्रीला चांगले दिवस येण्याआधी, मिथुन बिहारमधील सर्व सिंगल-स्क्रीन थिएटरसाठी आधारस्तंभ होते.”
मिथून चक्रवर्ती आणि ते ज्या निर्मात्यांबरोबर काम करत होते, त्यांचा उद्देश काय होता, यावरही विषेक चौहान यांनी वक्तव्य केले. ते म्हणाले, “चित्रपट कमी खर्चात बनवले जात होते. ते चित्रपट फार उच्च दर्जाचे नव्हते. ते मर्यादित बजेटसह सिंगल स्क्रीनसाठी बनवले जात होते आणि त्यांची व्यवसायाची संकल्पना अगदी स्पष्ट होती.”
“चित्रपट जर हाऊसफुल झाला, तर मिथून चक्रवर्ती दिवसाला १ लाख मानधन घेत असत. त्यांची अट अशी होती की चित्रपटाचे शूटिंग उटीमध्ये करावे लागेल. संपूर्ण क्रू त्यांच्या मालकीच्या मोनार्क हॉटेलमध्ये राहत असे आणि जोपर्यंत त्यांना त्यांचे मानधन दिले जात असे ते चित्रपटासाठी आवश्यक असलेले कोणतेही शूटिंग करण्यास तयार असत.”
पुढे त्यांनी एक किस्सादेखील सांगितला. ते म्हणाले, “चक्रवर्ती एक चुकीची स्टेप करत होते. त्यांचा हात चुकीच्या दिशेने जात होता. त्यामुळे कोरिओग्राफर तो सीनला होकार देत नव्हता. काही वेळा पुन्हा पुन्हा तोच सीन केल्यानंतर मिथून चक्रवर्ती चिडले. ते म्हणाले की माझा हात जर त्या दिशेने गेला तर चित्रपट हिट होणार आहे का? त्यावेळी मिथून चक्रवर्ती अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा जास्त यशस्वी होते.”