MM Keeravani : एस. एस. राजामौली यांच्या ‘आरआरआर’ या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या विभागात ऑस्कर पुरस्कार मिळवणारे संगीत दिग्दर्शक म्हणजे एम. एम. किरावानी आणि गीतकार चंद्रबोस. संगीत क्षेत्रातील योगदानाने चर्चेत राहणारे हे दिग्गज त्यांच्यावरील छळाच्या आरोपामुळे चर्चेत आले आहेत. एका गायिकेने संगीत विश्वातील दिग्गज मंडळींवर छळाचा आरोप केला आहे. प्रवस्ती आराध्याने ऑस्कर विजेते संगीतकार एमएम किरावानी, गीतकार चंद्रबोस आणि गायिका सुनीता यांच्यासह संगीत क्षेत्रातील काही व्यक्तींवर गंभीर आरोप केलेत.
प्रवस्ती आराध्या या १९ वर्षीय गायिकेने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओद्वारे तिने परिक्षकांवर अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आणि पक्षपातीपणाद्वारे छळ केल्याचा आरोप केला आहे. एमएम किरावानी यांनी तिला चांगले गुण तेव्हाच दिले, जेव्हा तिने त्यांची गाणी गायली. तसंच तिने या व्हिडीओमधून असं म्हटलं की, “किरावानी यांनी तिच्यावर एक टिप्पणी केली. ज्यामुळे तिला खूप दु:ख झाले. ते गाण्यांबद्दल इतके पक्षपाती होते की, जेव्हा मी शोमधून बाहेर पडले तेव्हा त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि लग्नात सादरीकरण करणारे गायक त्यांना आवडत नसल्याचे म्हटलं”
पुढे प्रवस्तीने शोच्या सेटवर प्रॉडक्शन हाऊसवर शारीरिक टिप्पणी केल्याचा आरोपही केला. याबद्दल ती म्हणाली की, “त्यांनी मला असं वागवलं की, मी निरुपयोगी आहे आणि माझ्या शरीराबद्दल चेष्टा केली”. तिने आरोप करत म्हटलं की, “प्रोडक्शन टीमने तिला पोटाखाली साडी नेसण्यास भाग पाडले. कॉस्च्युम डिझायनरने माझ्या चेहऱ्यावरून सांगितले की, माझ्या शरीरामुळे तो मला यापेक्षा चांगले कपडे देऊ शकत नाही.” या सगळ्यामुळे आपल्या आत्मसन्मान आणि आत्मविश्वासावर परिणाम झाला असल्याचाही तिने दावा केला.
पुढे गायिकेने एसपी बालसुब्रमण्यम यांचा मुलगा चरणवरही निशाणा साधला आणि म्हटले की, “हा शो पूर्ण स्क्रिप्टेड होता आणि शेवटच्या क्षणी गाणी बदलण्यात आली. जेणेकरून एलिमिनेशन शक्य होईल.” दरम्यान, या सगळ्यावर गायिका सुनीता यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबद्दल तिने म्हटलं की, “प्रवस्ती जेव्हा तू लहानपणी गायला सुरुवात केलीस, तेव्हा तू आमच्या मांडीवर बसायचीस आणि आम्ही तुझ्या गायनाचे कौतुक करायचो. पण आता तू मोठी झाली आहेस.”