Mukul Dev Last Instagram Post: प्रसिद्ध अभिनेते मुकुल देव यांचे ५४ व्या वर्षी निधन झाले आहे. मुकुल देव यांचे भाऊ अभिनेते व मॉडेल राहुल देव यांनी त्यांच्या निधनाबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत माहिती दिली आहे.

राहुल देव यांनी सोशल मीडियावर मुकुल देव यांच्या निधनाबाबत लिहिले, “आम्हाला कळविताना खूप दुःख होत आहे की, आमचा भाऊ मुकुल देव यांचे काल रात्री नवी दिल्लीत निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची मुलगी सिया देव आहे. मुकुल देव यांची भावंडे रश्मी कौशल, राहुल देव आणि पुतण्या सिद्धांत देव यांना त्यांची खूप आठवण येईल.”

मुकुल देव यांनी ‘दस्तक’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यांच्याबरोबर अभिनेत्री सुश्मिता सेन प्रमुख भूमिकेत होती. त्यांनी बॉलीवूडमधील अनेक प्रसिद्ध कलाकारांबरोबर काम केले आहे. माधुरी दीक्षित व नाना पाटेकर यांच्याबरोबर वजूद या चित्रपटातदेखील ते प्रमुख भूमिकेत दिसले होते. ‘कोहराम’, ‘किला’, ‘आवारा’ अशा अनेक चित्रपटांत त्यांनी काम केले आहे.

मुकुल देव यांची सोशल मीडियावरील शेवटची पोस्ट

मुकुल देव हे अभिनयाची कारकीर्द सुरू करण्यापूर्वी पायलट होते. आता त्यांच्या निधनानंतर त्यांनी केलेल्या शेवटच्या इन्स्टाग्राम पोस्टची चर्चा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुकुल देव यांनी शेवटची पोस्ट २६ फेब्रुवारीला केली होती. त्यांनी विमानातून ढग दिसत असल्याचा एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिले होते की, जर तुमचे डोके भीतीने फुटले, तर मी तुम्हाला चंद्राच्या अंधारात असलेल्या भागात भेटेन, अशा आशयाची कॅप्शन त्यांनी दिली होती.

मुकुल देव यांच्या निधनानंतर चाहत्यांनी त्यांच्या या पोस्टवर कमेंट करीत, देव तुमच्या आत्म्यास शांती देओ, अशा कमेंट्स केल्या आहेत. विशेष म्हणजे मुकुल देव यांनी फक्त बॉलीवूडमध्येच नाही, तर दाक्षिणात्य चित्रपटांतही काम केले आहे. त्यांनी टीव्हीवरील अनेक मालिकांमध्येही काम केले आहे. मुमकीन या मालिकेतून त्यांनी टीव्हीवर पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी अनेक गाजलेल्या मालिकांत काम केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनोज बाजपेयी, विंदू दारा सिंह, सोनू निगम, दीपशिखा या कलाकारांनी मुकुल देव यांच्या निधनानंतर त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या निधनाच्या दु:खातून सावरण्यासाठी देव त्यांना शक्ती देवो, असे त्यांनी म्हटले आहे. मुकुल देव यांच्या अचानक झालेल्या निधनानंतर अनेकांना धक्का बसला आहे.