Mumtaz reveals Dev Anands Obsession With Looking Young: दिग्गज अभिनेत्री मुमताज या काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहेत. विविध मुलाखतींमध्ये त्यांनी चित्रपटांच्या शूटिंगचे किस्से इतर दिग्गज कलाकार, अभिनेत्यांबरोबर काम करण्याचा अनुभव याबद्दल वक्तव्य केले आहे.
१९७१ साली प्रदर्शित झालेला ‘हरे रामा हरे कृष्णा’, १९७५ चा ‘प्रेम कहाणी’, १९७४ चा ‘चोर मचाए शोर’, अशा अनेक चित्रपटांतील मुमताज यांच्या भूमिका लोकप्रिय ठरल्या. त्यांनी राजेश खन्ना, अमिताभ बच्चन अशा अनेक लोकप्रिय कलाकारांबरोबर काम केले.
मला अभिमान वाटतो की…
नुकतीच मुमताज यांनी ‘रेडिओ नशा’ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी आजही लोक त्यांना तितकेच प्रेम देतात. त्यांच्या कामाचे कौतुक करतात, असे वक्तव्य केले. मुमताज म्हणाल्या, “मी या इंडस्ट्रीला ५० वर्षे दिली आहेत. मला अभिमान वाटतो की, लोक आजही माझ्यावर तितकेच प्रेम करतात. लोक फोटो काढण्यासाठी माझ्याजवळ येतात.”
“इतक्या वर्षांनंतरही लोक माझ्यावर तसेच प्रेम करतात. मला ओळखण्यासाठी लोकांना एक सेकंदही लागत नाही. तुम्ही छान दिसणे गरजेचे असते. आजही स्त्रियांपेक्षा पुरुष माझ्यावर प्रेम करतात.”
दिग्गज अभिनेते देव आनंद यांना आपण तरुण दिसले पाहिजे, असे वाटत असे. त्यांनी याबाबत मुमताज यांना सल्लादेखील दिला होता. मुमताज यांनी देव आनंद यांची एक आठवण सांगितली. तरुण दिसण्याबाबत देव आनंद त्यांना काय म्हणाले होते, याबद्दल मुमताज म्हणाल्या, “देव आनंद एकदा म्हणाले होते की, कलाकाराचे निधन झाले तरी तो चांगला दिसला पाहिजे.”
“तुम्ही तुमचे केस, शरीर आणि एकंदरीत तुमची स्वत:ची काळजी घेतली पाहिजे. कारण- तुम्ही जे दिसता, तेच तुम्ही आहात. जेव्हा तुम्ही रस्त्यावरून चालत असाल, तेव्हा पुरुष आणि महिलांनी तुमच्याकडे वळून पाहिले पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वत:ची काळजी घेता, तेव्हा तुम्हाला तुमच्या वयाची काळजी करण्याचे कोणतेही कारण नसते.”
मुमताज पुढे खुलासा करीत म्हणाल्या की, देव आनंद जेव्हा ८५ वर्षांचे होते. तेव्हा त्यांनी सिद्ध करून दाखवले की, वय फक्त एक आकडा आहे. त्यांनी त्यांच्या मेकअपमनला खोलीचा दरवाजा उघडण्यास सांगितले. त्यावेळी तीन महिला त्यांच्याकडे डोकावून पाहण्याचा प्रयत्न करीत होत्या. देव आनंद यांनी त्यांना सांगितले की, मी तुमच्याकडे थोड्या वेळात येतो. त्यानंतर त्यांनी खोलीचा दरवाजा बंद करण्यास सांगितले आणि मला ते म्हणाले की, बघ आजही माझ्याकडे पर्याय आहेत. मी त्यांना वाह, असे म्हणत त्यांचे कौतुक केले.
मुमताज यांनी त्यांच्या कारकिर्दीत धर्मेंद्र, शशी कपूर, देव आनंद, तसेच राजेश खन्ना यांच्याबरोबर काम केले आहे. आजही त्यांच्या चित्रपटांचे कौतुक होते.