Navya Naveli Nanda On Bachchan family: बॉलीवूडचे कलाकार जितके चर्चेत असतात, तितकेच त्यांचे कुटुंबिय, नातेवाईकदेखील चर्चेत असतात. अमिताभ बच्चन हे बॉलीवूडचे लोकप्रिय अभिनेते आहेत. सध्या ते कौन बनेगा करोडपती या शोचे सूत्रसंचालन करताना दिसतात. या शोचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.
आता अमिताभ बच्चन नाही तर त्यांची नात नव्या नवेली नंदा मोठ्या चर्चेत आली आहे. तिने नुकतीच बरखा दत्तला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिचे शिक्षण, तिचे करिअर, वर्गमित्र, तिला येत असलेले अनुभव याबरोबरच बच्चन कुटुंबाबाबतदेखील वक्तव्य केले आहे.
“आम्ही एका अशा कुटुंबात…”
नव्या म्हणाली, “मी लहानाची मोठी होत असताना माझ्या आजी-आजोबांबरोबर बराचसा वेळ घालवला. आजही मी खूप वेळ माझ्या आजी आजोबांबरोबर घालवते. आम्ही आजही एकत्र राहतो. बऱ्याचशा तरूणांसाठी ही असमान्य गोष्ट आहे. आम्ही भांडत नाही. विविध विषयांवर आम्ही आपापले विचार मांडत असतो. आजच्या काळाशी निगडीत अनेक गोष्टींवर आम्ही बोलत असतो. चर्चा करत असतो.”
नव्याचे स्वत:चे युट्यूब चॅनेल आहे. वॉट द हेल विथ नव्या असे तिच्या पॉडकास्टचे नाव आहे. यामध्ये बऱ्याचदा तिची आई श्वेता बच्चन आणि आजी जया बच्चन सहभागी होताना दिसतात. ते विविध विषयांवर गप्पा मारत असताना त्यांच्या मतांमध्ये विविधता दिसते. त्याचा संदर्भ देत नव्या म्हणाली, “जे कोणी पॉडकास्ट पाहत असेल, त्यांना माहित आहे की प्रत्येक एपिसोडमध्ये एकतर चर्चा होते किंवा मतभेद असल्याचे जाणवते. विशेष म्हणजे आम्ही सर्वजण वेगवेगळ्या व्यक्तीमत्वाचे आहोत. पण, आम्ही एकमेकांच्या विरोधात नसतो. आमची मूल्ये सारखीच आहेत. मी मोठी होत असताना ती मूल्ये माझ्यात रूजली आहेत. दोन्ही कुटुंबाकडून मिळालेली काही ठराविक मूल्ये आहेत.”
नव्या असेही म्हणाली की फक्त मलाच नाही तर माझा भाऊ अगस्त्य आणि अभिषेक-ऐश्वर्याची मुलगी आराध्या आम्हा सगळ्यांना आदराचे महत्व शिकवले गेले आहे. आम्ही एका अशा कुटुंबात मोठे झालो, जिथे एकमेकांप्रति खूप आदर आहे. मला वाटते की आदर ही अशी गोष्ट आहे, आमच्या सगळ्यांकडे आहे. मग ते माझे आजी-आजोबा असो किंवा आमच्या कुटुंबातील सर्वात लहान सदस्य असो. आम्हाला फक्त एकमेकांबद्दल किंवा इतर लोकांप्रतिच नाही तर आपण काय करतो आणि कुठून आलो आहोत, याबद्दलही खूप आदर आहे.”
नव्या पुढे म्हणाली, “आई गृहीणी असली आणि वडील उद्योजक असले तरी दोघांचे तितकेच महत्व आहे. कोणी सीईओ आहे किंवा गृहीणी आहे हे महत्वाचे नसून एकमेकांप्रति आदर असणे गरजेचे आहे. गृहिणी जे काम करतात, त्याचं त्यांना पुरेसं श्रेय मिळत नाही. दशलक्ष डॉलरची कंपनी चालवणाऱ्या सीईओला खूप गोष्टींचे श्रेय मिळते.गृहिणी पुढची पीढी तयार करत असतात. ती खूप मोठी भूमिका आहे. आपण त्यांना फारसे श्रेय देत नाही.”
नव्या तिच्या पालकांबाबत म्हणाली, “आता मी मोठी झाली आहे. पाठीमागे वळून बघताना जाणवते की आज मी जी कोणी आहे, त्याचे संपूर्ण श्रेय माझ्या पालकांचे आहे. मला याची जाणीव आहे की हे काम निस्वार्थी भावनेने पालकांनी केलेले असते. आपण आपल्या पालकांचे आभार मानत नाही. जे आपल्या वाढतात, मोठे करतात, त्यांची भूमिका आपल्या आयुष्यात मोठी असते.”
