Nawazuddin Siddiqui on Struggle : नवाजुद्दीन सिद्दीकीने जॉन मॅथ्यू मॅथनच्या १९९९ मध्ये आलेल्या ‘सरफरोश’ या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. पण, त्याला खरा ब्रेक मिळाला तो अनुराग कश्यपच्या ‘गँग्स ऑफ वासेपूर पार्ट -२’ या चित्रपटातून. २०१२ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामधील त्याच्या भूमिकेने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं.
नवाजुद्दीन सिद्दीकी आता अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसतो. पण, इथपर्यंतचा त्याचा प्रवास सोपा नव्हता. त्याला चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका मिळण्याआधी १२-१५ वर्षे संघर्ष करावा लागल्याचं अभिनेत्याने सांगितलं आहे. अशातच आता नवाजुद्दीन सिद्दीकीने त्याच्या ‘मैं ॲक्टर नही हू’ या चित्रपटाबद्दलही सांगितलं आहे. या चित्रपटामध्ये त्याने संघर्ष करणाऱ्या एका कलाकाराची भूमिका साकारली आहे. याबाबत नुकतंच त्याने ‘स्क्रीन’शी संवाद साधला आहे. यादरम्यान त्याला एका अभिनेत्यासाठी संघर्ष करणाऱ्या कलाकाराची भूमिका साकारणं सोप असतं की कठीण असा प्रश्न विचारण्यात आला होता.
नवाजुद्दीन विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना म्हणाला, “हे खूप सोपं आहे, कारण मी खूप काळ संघर्ष केला आहे. जवळपास १२-१५ वर्षे मी संघर्ष केला आहे आणि अजूनही माझा संघर्ष सुरू आहे. पण, जेव्हा तुमच्याकडे अनुभव असतो तेव्हा ती भूमिका साकारणं तुमच्यासाठी सोपं जातं.” यासह पुढे नवाजुद्दीनबद्दल ‘मै ॲक्टर नही हू”चे दिग्दर्शक आदित्य कृपलानी म्हणाले, “पहिल्या दिवसापासूनच त्याने वाईट अभिनय करणाऱ्या कलाकाराची भूमिका चोख पार पाडली आहे. कारण कुठेही त्याचा अभिनय खोटा किंवा नाट्यमय वाटला नाही. त्याने खूप नैसर्गिक अभिनय केला आणि माझ्या मते हीच त्याच्यासाठी मोठी पोचपावती आहे.”
दरम्यान, ‘मैं ॲक्टर नही हू’ या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटाचं दिग्दर्शन आदित्य कृपलानी यांनी केलं आहे. मार्च २०२५ ला कॅलिफोर्नियामध्ये या चित्रपटाचा प्रीमियर पार पडला होता. आता लवकरच हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हिंदी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये हा चित्रपट बनवला गेला आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार हा चित्रपट निवृत्त बँकर आणि एका अभिनेत्यामध्ये अभिनय शिकण्याच्या प्रवासावर आधारित आहे. यामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी व चित्रांगदा सतरूपा महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.