पूर्व पत्नी आलिया सिद्दीकीच्या आरोपांवर स्टेटमेंट जाहीर करून उत्तर देणाऱ्या अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने आता पुन्हा एकदा या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केलं आहे. आलिया हे सगळं सार्वजनिकपणे बोलून काय साध्य करण्याचा प्रयत्न करतेय, ते आपल्या लक्षात येत नसल्याचं नवाजुद्दीनचं म्हणणं आहे. तसेच त्याने मुलांची चिंता सतावत असल्याचंही म्हटलं आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी पुन्हा अडचणीत; कॉल रेकॉर्डिंग शेअर करत भाऊ शमासचा गंभीर खुलासा, व्हिडीओ जाहीर करण्याचाही इशारा

‘इन्स्टंट बॉलिवूड’ला दिलेल्या मुलाखतीत नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला, “माझ्या मुलांची मला खूप काळजी वाटत आहे. त्यांनी शाळेत जावं, एवढीच माझी इच्छा आहे. या सर्व गोष्टींमुळे मी मानसिकरित्या खूप मजबूत झालो आहे. या गोष्टींचा माझ्यावर फारसा परिणाम होत नाही. आजकाल सोशल मीडियावर कोणत्याही गोष्टी लवकर व्हायरल होतात आणि आपण त्यावर विश्वास ठेवतो. ती ज्या गोष्टी करतेय, त्यामागचा तिचा उद्देश काय आहे, हे मला अजिबात माहीत नाही. या सगळ्या गोष्टी अफवा पसवण्यासाठी केल्या जात आहेत,” असंही त्याने नमूद केलं.

“माझ्या घरातील गोष्टी मी बोलू इच्छित नाही. पण, माझी मुलं शाळेत जावीत एवढीच माझी इच्छा आहे आणि त्यांचीच चिंता मला सतावत आहे”, असं नवाजुद्दीन सिद्दीकी यावेळी म्हणाला. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी नवाजुद्दीन सिद्दीकीने या प्रकरणी स्टेटमेंट जाहीर करत आलिया पैशांसाठी या सर्व गोष्टी करत असल्याचं म्हटलं होतं.