बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. गेली अनेक वर्ष त्या सातत्याने वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट करत आहेत. नीना गुप्ता या सोशल मीडियावरही चांगल्याच सक्रिय असतात. आता नीना गुप्ता या त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. १९८२ साली आलेल्या ‘साथ साथ’ या चित्रपटानंतर नीना यांना मूर्ख मुलीच्याच भूमिका ऑफर होऊ लागल्या याविषयी नीना यांनी भाष्य केलं आहे.

‘साथ साथ’ चित्रपटात नीना यांनी चश्मा असलेल्या एका सर्वसाधारण आणि थोडीशी वेडसर किंवा भोळ्या मुलीची भूमिका साकारली होती. ‘शारजा इंटरनॅशनल बुक फेअर’दरम्यान नीना गुप्ता म्हणाल्या, “मला या चित्रपटात एका विनोदी अन् थोडी मूर्ख अशा मुलीची भूमिका देण्यात आली होती जी प्रत्येक गोष्टीला नकार देत असते. हा चित्रपट तेव्हा चांगलाच गाजला व माझी भूमिकाही लोकांना आवडली.”

आणखी वाचा : व्हायरल ‘डीपफेक’ व्हिडीओनंतर रश्मिका मंदाना आली मीडियासमोर; ‘अशी’ होती अभिनेत्रीची अवस्था

या चित्रपटाच्या प्रीमियरदरम्यान अभिनेते गिरीश कर्नाड हे नीना गुप्ता यांना भेटले अन् त्यावेळचा किस्सा नीना गुप्ता यांनी सांगितला. त्या म्हणाल्या, “त्यावेळी चित्रपट पाहून गिरीश कर्नाड म्हणाले की मला यापुढे प्रमुख भूमिका किंवा हिरॉईन म्हणून भूमिका मिळणं बंद होईल. कारण जेव्हा तुम्ही एखादी विनोदी भूमिका साकारता तेव्हा तिथेच तुमच्या फिल्मी करिअरला ब्रेक लागतो असं गिरीश कर्नाड यांचं मत होतं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे नीना गुप्ता म्हणाल्या, “त्यांचं म्हणणं अगदी योग्यच होतं. पुढील काही वर्षं तरी मला तशाच विनोदी भूमिका ऑफर केल्या गेल्या. हा एक व्यवसाय आहे आणि त्यावेळी मला मार्गदर्शन करणारेही कुणीच नव्हते. मी एनएसडी मधून शिक्षण घेऊन आली असल्याने मला मुंबईत लगेच काम मिळेल असा माझा समज होता, पण तो चुकीचा ठरला, हा चित्रपट व्यवसाय आहे आणि मला याबद्दल फारशी माहिती नसल्याने मी तेव्हा बऱ्याच चुका केल्या.” नीना गुप्ता नुकत्याच सोनी लीव्हच्या ‘चार्ली चोप्रा’ व नेटफ्लिक्सच्या ‘लस्ट स्टोरीज’ या सीरिजमध्ये झळकल्या होत्या.