बॉलीवूडचे कलाकार सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटातील भूमिकेमुळे, कधी त्यांच्या वक्तव्यामुळे तर कधी सोशल मीडियावरील पोस्टमुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात. गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा चर्चेत आहे.

निक जोनासने काय म्हटले?

अमेरिकन गायक आणि प्रियांका चोप्राचा पती निक जोनासने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्याने हे जोडपे चर्चांचा भाग बनले आहे. निक जोनसने इन्स्टाग्राम अकाउंटवर दोघांचा एक फोटो शेअर करत म्हटले आहे की, सहा वर्षांपूर्वी एका सुंदर, विस्मयकारक स्त्रीला मी लग्नासाठी विचारले होते. मला होकार दिल्याबद्दल, धन्यवाद! निकने या दिवशी प्रियांकाला लग्नासाठी विचारले होते, त्या निमित्ताने त्याने ही पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या पोस्टवर चाहत्यांनी खूप सुंदर जोडी असे म्हणत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रियांकाचा पती निक जोनास हा अमेरिक गायक असून, तो अभिनय क्षेत्रातदेखील काम करताना दिसतो. डिसेंबर २०१८ ला या जोडीने लग्नगाठ बांधली. या दोघांच्या वयात १० वर्षांचे अंतर असून, प्रियांका चोप्रा निकपेक्षा वयाने मोठी असल्याने त्यांच्या लग्नासंबंधी चर्चा रंगल्या होत्या. या जोडप्याला दोन वर्षांची मुलगी असून, तिचे नाव मालती असे आहे. प्रियांकाने नुकताच आपला ४२ वा वाढदिवस साजरा केला. त्यावेळी निक जोनासने इन्स्टाग्राम अकाउंटवर प्रियांकासोबतचे काही फोटो शेअर करीत, “तू स्त्री म्हणून जशी आहेस, त्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतो. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!” असे लिहीत त्याने प्रेमळ शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळाले होते.

हेही वाचा: मुंबईच्या सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन यंदा गणपतीपुळेचा प्रवास कोकण रेल्वेने होणार; ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपट ‘या’ तारखेला भेटीला येणार

प्रियांका चोप्राने २००२ मध्ये तमीळ चित्रपट ‘थामिझन’मधून चित्रपटसृष्टीत आणि २००३ मध्ये ‘हीरो : लव्ह स्टोरी ऑफ स्पाय’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. ‘फॅशन’, ‘बर्फी’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘ऐतराज’, ‘सात खून माफ’, ‘मेरी कोम’, ‘द स्काय इज पिंक’, ‘कमीने’ अशा एकापेक्षा एक चित्रपटांतील विविध भूमिकांच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. सध्या ही देसी गर्ल हॉलीवूडमध्येदेखील आपला चाहतावर्ग निर्माण करीत असल्याचे पाहायला मिळत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, प्रियांका आणि निक जोनास यांनी नुकतीच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला हजेरी लावली होती. त्या वेळचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. प्रियांका चोप्राच्या कामाबद्दल बोलायचे, तर ती लवकरच हॉलीवूड चित्रपट ‘द ब्लफ’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याबरोबरच फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ चित्रपटात आलिया भट्ट कतरिना कैफ यांच्यासोबत अभिनय करताना दिसणार आहे.