मागच्या आठवड्यामध्ये अमिताभ बच्चन यांचा ‘गुडबाय’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाद्वारे दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अमिताभ, रश्मिका यांच्यासह नीना गुप्ता, सुनील ग्रोवर, आशीष विद्यार्थी अशी या चित्रपटाची स्टारकास्ट आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान या वर्षी अमिताभ आणखी एक चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. पुढच्या महिन्यामध्ये त्यांचा ‘ऊंचाई’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

अमिताभ बच्चन सोशल मीडियावर फार सक्रिय आहेत. यावर ते सतत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतात. त्यांनी नुकत्याच त्यांच्या ‘ऊंचाई’ या चित्रपटाचे नवे पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. या पोस्टरद्वारे या चित्रपटातला त्यांचा लूक समोर आला आहे. पोस्टरच्या तीन तृतीयांश भागामध्ये त्यांचा मोठा फोटो आहे. त्यांच्या कपड्यावरुन हा फोटो एखाद्या बर्फाच्छित परिसरातला असल्याचे लक्षात येते. या फोटोखाली त्यांचे नाव दिले आहे. पोस्टरमध्ये सर्वात शेवटचा भाग चित्रपटातील गाण्यातला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे यामध्ये अमिताभ यांनी गोरखा/नेपाळी टोपी घातली आहे.

आणखी वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेअर केला पुनीत राजकुमार यांच्या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर, म्हणाले…

उद्या अमिताभ यांचा वाढदिवस आहे. हे निमित्त साधन चित्रपटाच्या टीमने हे पोस्टर आज प्रदर्शित केले. या पोस्टरमधून त्यांनी या पात्राची थोडक्यात ओळख करुन दिली आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी “राजश्री फिल्म्सची खास पेशकश. ११.११.२२ रोजी मला अमित श्रीवास्तवच्या रुपात भेटा. सूरज बडजात्या यांचा ऊंचाई हा चित्रपट जीवन आणि मैत्रीचा उत्सव साजरा करतो.” असे लिहिले आहे. काही दिवसांपूर्वी अमिताभ यांनी चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले होते.

आणखी वाचा – रेखा आणि अक्षय यांच्यातील नात्याबद्दल रविना टंडनने केलं होतं वक्तव्य; म्हणाली…

सूरज बडजात्या दिग्दर्शित या चित्रपटामध्ये अमिताभ यांच्यासह बोमन इराणी, अनुपम खेर हे कलाकार प्रमुख भूमिकेमध्ये आहेत. तर नीना गुप्ता, सारिका, परिणीती चोप्रा, नफीसा अली आणि डॅनी डॅन्झोपा यांनी चित्रपटात सहाय्यक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. चित्रपटाची निर्मिती राजश्री फिल्म्स या निर्मितीसंस्थेने केली आहे.