चित्रपट प्रदर्शनाची तारीख जवळ आली की बॉलिवूड स्टार्स सर्वतोपरी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी प्रयत्न करतात. त्यासाठी ते विविध शहरांमध्ये जाऊन अनेक कार्यक्रमांना उपास्थित राहतात. त्याचप्रमाणे अनेक मालिका, रिअॅलिटी शोमध्येही हजेरी लावत ते आपल्या चित्रपटाचं प्रमोशन करतात. ‘द कपिल शर्मा शो’ हा हिंदी टेलिव्हिजन विश्वातील एक आघाडीचा कार्यक्रम आहे जिथे बॉलिवूड स्टार्स आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी येतात. या कार्यक्रमामुळे कपिल शर्माला एक वेगळी ओळख मिळाली.
नुकतंच एका मुलाखतीमध्ये कपिल शर्माने त्याच्या डिप्रेशनबद्दल खुलासा केला आहे. मध्यंतरी कपिल बराच डिप्रेशनमध्ये होता आणि तो बऱ्याच वादांमध्येसुद्धा अडकायचा. यावरच कपिलने एका मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. इतकंच नाही तर यादरम्यान त्याने याच्याशी निगडीत शाहरुख खानबरोबरचा एक किस्साही सांगितला. कपिल खूप डिप्रेस असल्याने त्याने एकदा शाहरुख खानबरोबरच आपल्या कार्यक्रमाचं शूट रद्द केलं होतं आणि ही गोष्ट कपिलला प्रचंड सतावत होती.
आणखी वाचा : बॉलिवूडचा ‘पठाण’ आणि ‘खलनायक येणार एकत्र? शाहरुख खानच्या ‘जवान’मध्ये संजय दत्त साकारणार ‘ही’ भूमिका
‘आज तक’शी बोलताना कपिल म्हणाला, “शूटिंग रद्द झाल्यावर २-३ दिवसांनी शाहरुख खान मला भेटायला आले. त्यांनी मला त्यांच्या गाडीत तासभर बसवून ठेवलं आणि माझी विचारपुस केली, मी ड्रग्स घेतोय का? असंही विचारलं, त्यावर मी त्यांना स्पष्ट नाही म्हणून सांगितलं. मग मी त्यांना माझ्या डिप्रेशनबद्दल सांगितलं, त्यावर त्यांनी माझी खूप समजूत काढली.”
या सगळ्यामधून बाहेर यायला कपिलला बराच वेळ लागला, दरम्यान त्याला दारूचं व्यसनही लागलं. त्याच्या पत्नीनेही त्याल डिप्रेशनमधून बाहेर आणण्यासाठी बरेच प्रयत्न केले. कपिल आता ‘ज्विगाटो चित्रपटातून एका डिलीव्हरी बॉयचे पात्र साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन नंदिता दासने केले असून कपिल शर्माच्याबरोबरीने गुल पनाग, सयानी गुप्ता हे कलाकारदेखील आहेत. हा चित्रपट बऱ्याच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये दाखवण्यात आला आहे.