Pallavi Joshi Talks About Mithun Chakraborty : पल्लवी जोशी बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. सध्या त्या त्यांच्या ‘द बंगाल फाइल्स’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. अशातच त्यांनी यामधील अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. ‘द बंगाल फाइल्स’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. सध्या त्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. यानिमित्तानेच त्यांनी नुकतीच ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत त्यांचं कौतुकही केलं आहे.
पल्लवी जोशी यांनी सांगितला मिथुन चक्रवर्ती यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव
पल्लवी जोशी ‘दाता’ चित्रपटात मिथुन चक्रवर्तींबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत म्हणाल्या, “मिथुन चक्रवर्ती ‘दाता’च्या वेळी खूप वेगळे होते. त्यावेळेला ते स्टार होते. ते कोणाकडे बघायचे नाहीत आणि उशिरा यायचे. ९ च्या शिफ्टला २ वाजता वगैरे यायचे आणि ते आले की, पटपट त्यांच्याबरोबरचे सगळे शॉट्स संपवले जायचे आणि मग ते निघून जायचे. एका दिवसाला ते ४-५ शिफ्ट करायचे, त्यामुळे ते किती वाजता कोणत्या सेटवर जाणार आहेत हे कोणालाच माहीत नसायचं, त्यामुळे आम्ही तिथे थांबून असायचो.”
पल्लवी जोशी पुढे म्हणाल्या, “त्यांनाही दिवसाला पाच शिफ्ट केल्यामुळे त्रास होत असणार, त्यामुळे अनेकदा ते सेटवर आल्यानंतर दिग्दर्शकांचं ऐकायचेच नाहीत. त्यांची चेष्टा मस्करी करायचे आणि म्हणायचे, मला तर हे सर्व करताच येत नाही, असा टवाळखोरपणा ते खूप करायचे. त्यानंतर मध्यंतरीच्या काळात माझा आणि त्यांचा फार संपर्क नव्हता.”
मिथुन यांच्याबद्दल पल्लवी जोशी पुढे म्हणाल्या, “त्यांचं आयुष्यामध्ये एक ध्येय होतं की मला एवढे एवढे पैसे कमवायचे आहेत आणि ज्या दिवशी त्यांनी ते पैसे कमावले त्यानंतर ते मुंबई सोडून गेले. नंतर त्यांनी उटीमध्ये त्यांचं हॉटेल वगैरे सुरू केलं आणि तिथेच स्थायिक झाले. त्यानंतर जर तुम्हाला माझ्याबरोबर काम करायचं असेल तर तुम्ही उटीमध्ये या आणि उटीमध्ये शूट करा, असं त्यांनी स्वत:च्या तत्वांवर काम केलं आणि नंतर बराच काळ ते काम करत होते. ते खूप मोठी व्यक्ती आहेत आणि कमाल आहेत.”
“मी ‘मुज्रीम’, ‘दाता’, ‘झुठी शान’, ‘ताश्कंद’, ‘द काश्मीर फाइल्स’ आणि आता ‘द बंगाल फाइल्स’ अशा सहा चित्रपटांत काम केलं. मुलाखतीत पल्लवी यांना आताच्या मिथुन दादांबद्दल काय सांगाल आम्हाला असं विचारण्यात आलेलं. यावर त्या म्हणाल्या, “आता मला थोडा वेगळा अनुभव यासाठी येतो, कारण आता मी निर्मातीसुद्धा आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा मी त्यांना भेटायला जाते, तेव्हा मला एका कलाकाराची पूर्व तयारी कशी असते हे दिसतं. ते कित्येक वेळेला मला फोन करून सांगतात की, मी असा असा विचार केला आहे या रोलच्या बाबतीत. तू विवेकला सांग मला भेटायला, मला थोडा वेगळ्या पद्धतीचा कॉस्टयूम पाहिजे असं म्हणून ते बदल सुचवतात. इतकं ते छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देतात.”
पल्लवी जोशी यांनी केलं मिथुन चक्रवर्तींचं कौतुक
मिथुन चक्रवर्तींचं कौतुक करत पुढे त्या म्हणाल्या, “‘द बंगाल फाइल्स’बद्दल बोलायचं झालं तर जसं ट्रेलरमध्ये दिसतंय की, त्यांना संवाद साधताना अवघड जातं, तर मग अशी समस्या असलेली व्यक्ती कशी बोलेल हे त्यांनी मला करून दाखवलं. ते पाहून टचकन पाणी आलं माझ्या डोळ्यात. एकतर त्यांचा अभिनय खूप कमाल आहे आणि या वयामध्ये कोणालाही इतकं पॅशनेटली काम करण्याची काही गरज नाहीये. त्यांनी आयुष्य गाजवलंय, पण तरीसुद्धा ते कामाप्रती तितकेच शिस्तप्रिय आहेत, त्यांच्याकडून हे शिकण्यासारखं आहे.”