‘हेरा फेरी ३’ हा चित्रपट काही दिवासांपासून चर्चेचा विषय ठरला आहे. चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असलेले अभिनेते परेश रावल यांनी चित्रपटात काम न करण्याचा निर्णय घेतल्याने याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. त्यानंतर परेश रावल व चित्रपटाचे दिग्दर्शक यांच्यामधील वैचारिक मतभेदांमळे त्यांनी हा निर्णय घेतला अशा अनेक अफवांना मध्यंतरी उधाण आलं होतं. परंतु, नंतर परेश यांनी स्वत: एक्सवर पोस्ट करीत या अफवा खोट्या असल्याचं म्हटलं.
अभिनेते सुनील शेट्टी यांनीसुद्धा याबाबत त्यांची प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी म्हटलं होतं “एक वेळ मी किंवा अक्षय कुमार नसलो तरी हा चित्रपट बनवता येऊ शेकतो; पण जर परेश रावल नसतील तर हा चित्रपट बनवणं कठीण आहे.” त्यामुळे ‘हेरा फेरी ३’मधील परेश रावल यांची भूमिका कोण साकारणार, असा प्रश्न उपस्थित झाला असताना चित्रपटाच्या चाहत्यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांना बाबू भय्याच्या भूमिकेसाठी अभिनेते पंकज त्रिपाठी यांचं नाव सुचवलं आहे.
पंकज त्रिपाठी यांनी याबाबत ‘बॉलीवूड हंगामा’शी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “मी ऐकलं आणि वाचलं आहे की, बाबू भय्या हे पात्र मी साकारावं, अशी प्रेक्षकांची इच्छा आहे. पण, मला असं नाही वाटत की, मी ही भूमिका साकारू शकतो. मी परेश रावल यांचा खूप आदर करतो. त्यामुळेच मला असं वाटतं की, या भूमिकेसाठी मी योग्य व्यक्ती नाही.” दरम्यान, पंकज त्रिपाठी पुन्हा एकदा ‘क्रिमिनल जस्टिस’मध्ये माधव मिश्रा या भूमिकेत झळकणार आहेत.
पंकज त्रिपाठी हे एक अष्टपैलू अभिनेते असून, ते विशेषकरून त्यांच्या विनोदी भूमिकांसाठी ओळखले जातात. त्यांनी ‘फुकरे,’ ‘मिर्झापूर,’ ‘स्री,’ ‘बंटी और बबली २’ यांसारख्या चित्रपटांत विनोदी भूमिका साकारत, प्रेक्षकांना पोट धरून हसवलं आहे. त्यामुळेच आता परेश रावल यांनी ‘हेरा फेरी ३’मधून एक्झिट घेतल्यानंतर चित्रपटाच्या चाहत्यांनी अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्या नावाचा आग्रह धरला आहे.