Paresh Rawal on Marathi Theatre: मराठी रंगभूमीवरील अनेक नाटके देशभरात लोकप्रिय आहेत. बॉलीवूड अभिनेते परेश रावल यांनी नुकतीच ‘द लल्लनटॉप’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी मराठी नाटकांचे कौतुक केले. मराठी रंगभूमी कशी समृद्ध आहे, यावर त्यांनी वक्तव्य केले.
परेश रावल मराठी नाटकांबाबत काय म्हणाले?
परेश रावल यांनी त्यांच्या अभिनयाची सुरुवात कशी झाली, हे सांगताना मराठी नाटक बघत अभिनय शिकलो असे वक्तव्य केले. परेश रावल मराठी नाटकांबाबत म्हणाले, “मी खूप मराठी नाटकं बघितली आहेत. हिंदी नाटकांमध्ये दुबे साहेबांचेच जास्त नाटक असायचे. रंगभूमीवर नवनवीन मराठी नाटकं यायची. सुलभा देशपांडे, अरविंद देशपांडे, श्रीराम लागू सगळ्यांचे नाटक मी बघायचो. जे मराठी नाटक येईल ते मी बघायचो. आपण खूप नशिबवान होतो आणि आहोत की मराठी लोक इतकं चांगलं नाटक करतात. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळतं.”
पुढे परेश रावल म्हणाले, “प्राजक्ता देशमुख यांचं ‘देवबाभळी’ हे संगीत नाटक आहे. गोष्ट काय आहे, तर दोन स्त्रियांची गोष्ट त्यामध्ये पाहायला मिळते. एक संत तुकारामांची पत्नी आहे, तर दुसरी भगवान विठ्ठलाची पत्नी आहे. संत तुकारामांची पत्नी गर्भवती असते. विठ्ठलाला तर माहीत आहे की माझा जो भक्त आहे तुकाराम तो जंगलातून देवाच्या शोधात फिरत आहे. त्याच्या पत्नीचा सांभाळ कोण करेल. तर विठ्ठल त्याच्या पत्नीला संत तुकारामांच्या पत्नीची सेवा करण्यासाठी पाठवतो.”
“नाटकात विठ्ठल आणि संत तुकारामांची पत्नी यांच्यातील संवाद पाहायला मिळतात. दोन महिला त्यांच्या पतीबाबत एकमेकींशी जे बोलतात, ते ऐकल्यानंतर अंगावर काटा येतो. हे नाटक संगीत नाटक आहे. ते इतकं सुंदर पद्धतीने साकारलं आहे की शेवटी त्यांना प्रेक्षकांना डेमो देऊन सांगावं लागतं की हे रेकॉर्ड केलेलं नाही; तर ते प्रत्यक्षात गात आहेत. खूप छान नाटक आहे. मराठी लोक खूप पुढे आहेत.”
दरम्यान, याच मुलाखतीत परेश रावल यांनी त्यांच्या करिअरबद्दल, पुरस्कारांमध्ये होत असलेल्या लॉबीबद्दल, त्यांच्या हेरा फेरी चित्रपटातील गाजलेल्या बाबूराव या भूमिकेबद्दल वक्तव्य केले. तसेच त्यांनी नाना पाटेकरांचा एक किस्सादेखील सांगितला. नाना पाटेकरांनी एका निर्मात्याला घरी बोलावून मटण खाऊ घातलं आणि त्याला भांडी स्वच्छ करायला लावली, अशी आठवण त्यांनी सांगितली. तसेच कॅरेक्टर आर्टिस्ट म्हणून एक कोटी मानधन घेणारे नाना पाटेकर पहिले कलाकार होते, असा खुलासादेखील त्यांनी केला.