आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे यांचा ‘ड्रीम गर्ल २’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. ‘गदर २’सारखा चित्रपट समोर असतानाही हा चित्रपट चांगला व्यवसाय करत आहे. यामध्ये परेश रावलही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटातून आयुष्मान खुराना आणि परेश रावल यांनी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर केल्याचं स्पष्ट झालं आहे. परंतु आपल्या चित्रपटातील भूमिकेबाबत परेश रावल समाधानी नसल्याचं समोर आलं आहे.

नुकतंच एका मीडिया पोर्टलशी संवाद साधताना आपल्या भूमिकेला अधिक स्क्रीन स्पेस मिळायला हवी होती असं वक्तव्य परेश यांनी केलं आहे. परेश रावल म्हणाले, “ड्रीम गर्ल २ मध्ये माझी उत्तम भूमिका आहे, पण आयुष्मानसारखी मोठी भूमिका नाही. पण ही भूमिका उत्तम आहे. कधी कधी वाईट चित्रपटात कमी स्क्रीन टाइम मिळणं चालू शकतं पण ‘ड्रीम गर्ल’सारख्या प्रोजेक्टमध्ये आपल्या भूमिकेला आणखी स्क्रीन टाइम हवा असतो.”

आणखी वाचा : ‘जवान’चा दिग्दर्शक अ‍ॅटली मंचावर आईला घेऊन आला, अन् शाहरुख खानची ‘ही’ कृती ठरली कौतुकास्पद; व्हिडीओ व्हायरल

याबरोबरच परेश यांनी सध्याच्या विनोदी चित्रपटांवरही भाष्य केलं आहे. सध्या कॉमेडीचा दर्जा खालवला असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. परेश म्हणाले, “विनोदी चित्रपटांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर उत्तम स्क्रिप्ट आपल्याकडे कुणीच लिहीत नाही त्यामुळे चांगल्या विनोदी चित्रपटात मोठी भूमिका मिळणं हे अशक्यच झालं आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परेश रावल यांनी मध्यंतरी सुपरहीट चित्रपटांच्या बनणाऱ्या सीक्वल्सवरही भाष्य केलं होतं. येत्या काळात परेश रावल हे ‘वेलकम ३’, ‘आवारा पागल दिवाना २’ आणि ‘हेरा फेरी ३’ या सुपरहीट चित्रपटांच्या सीक्वल्समध्ये दिसणार आहेत. अशा चित्रपटांचे पुढील भाग यायला हवेत असं मत मध्यंतरी परेश रावल यांनी मांडलं होतं.