बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा व तिचे पती राजकारणी राघव चड्ढा कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावणार आहेत. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मधील या जोडप्याचा प्रोमो रिलीज करण्यता आला आहे. यामध्ये ते पहिली भेट, त्यांचं नातं आणि काही मजेदार किस्से कपिल शर्मा व त्याच्या टीमला सांगताना दिसतात.
प्रोमोच्या सुरुवातीलाच राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा हातात हात घालून स्टेरवर येतात. पण कपिल शर्माचे लक्ष लगेचच राघव यांच्या अनवाणी पायांकडे जाते. कपिल गमतीत त्यांना विचारतो की परिणीतीशी लग्न झाल्यास तो अनवाणी शोमध्ये येणार? त्यानंतर राघव त्यांचे बूट चोरीला गेले असं सांगतात. त्यानंतर कृष्णा अभिषेक आणि किकू शारदा बूट घेऊन सेटवर येतात आणि त्या बदल्यात पैसे मागतात. त्यावर हे नेत्याकडे पैसे मागतायत, असं राघव म्हणतात.
या एपिसोडमध्ये परिणीती सांगते की ती पती राघव चड्ढा यांना पहिल्यांदा लंडनमध्ये भेटली होती. उत्सुकतेपोटी तिने भेटीनंतर लगेचच गुगलवर राघव यांच्याबद्दल काय सर्च केलं होतं ते सांगितलं. तिने राघव चड्ढा यांची उंची किती, असं सर्च केलं होतं. त्यावर आपण उंच असल्याचं राघव उभे राहून सांगतात.
परिणीती चोप्रा जे बोलते त्याचं उलट घडतं
राघव परिणीतीबद्दल म्हणतात, “ही जे बोलते, त्याच्या उलट घडतं. ती म्हणाली होती की कधीच राजकारण्याशी लग्न करणार नाही आणि तिचं लग्न राजकारण्याशी झालं. आता मी रोज सकाळी उठल्यावर तिला म्हणतो, ‘तू म्हण की राघव चड्ढा कधीही भारताचे पंतप्रधान होणार नाहीत’.” राघव असं म्हणताच प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकतो.
पाहा व्हिडीओ-
परिणीती चोप्रा व राघव चड्ढा यांनी २०२३ मध्ये एका खासगी समारंभात लग्न केलं. त्यांचं लग्न उदयपूर येथे द लीला पॅलेसमध्ये पार पडलं होतं. या लग्नात परिणीती व राघव यांचे कुटुंबीय व जवळचे नातेवाईक उपस्थित होते. आदित्य ठाकरेंसह इतर राजकीय नेत्यांनी या लग्नाला हजेरी लावली होती.
परिणीती चोप्रा शेवटची अमर सिंग चमकीला चित्रपटात झळकली होती. यामध्ये दिलजीत दोसांझची मुख्य भूमिका होती. लवकरच ती नेटफ्लिक्सच्या एका सीरिजमध्ये झळकणार आहे. सिद्धार्थ पी मल्होत्रा व सपना मल्होत्रा दिग्दर्शित या सीरिजचं दिग्दर्शन रेंसिल डीसिल्वाने केलं आहे. नाव न ठरलेल्या या सीरिजमध्ये परिणीतीबरोबर ताहिर राज भसीन, जेनिफर विंगेट, हरलीन सेठी, चैतन्य चौधरी, सुमित व्यास आणि अनुप सोनी हे कलाकार झळकणार आहेत.