यावर्षी दाक्षिणात्य चित्रपटांनी बॉलिवूड चित्रपटांना चांगलंच मागे टाकलं आहे. ‘केजीएफ चॅप्टर २’पासून ‘कांतारा’ पर्यंत बॉक्स ऑफिसवर दाक्षिणात्य चित्रपटांनी जबरदस्त कमाई केली आहे. खरंतर कोविड काळापासूनच दाक्षिणात्य चित्रपटांनी हिंदी चित्रपटांवर कुरघोडी करायला सुरुवात केली. यावर बऱ्याच कलाकारांनी उघडपणे भाष्यदेखील केलं आहे. बॉलिवूड नेमकं कुठे कमी पडतं आहे हेदेखील बऱ्याच लोकांनी मांडलं आहे.

नुकतंच अभिनेता, गीतकार आणि गायक पियुष मिश्रा यांनीदेखील याबद्दल मत व्यक्त केलं आहे. हिंदी चित्रपट आणि दिग्दर्शक एकाच साच्यात अडकून पडल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. ‘एएनआय’शी संवाद साधताना पियुष यांनी याबद्दल वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, “बॉलिवूडच्या दिग्दर्शकांपेक्षा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक हे जास्त हुशार आहेत, शिवाय त्यांचा बुद्धयांकदेखील आपल्यापेक्षा जास्त आहे आणि ते आपल्यापेक्षा अधिक कल्पक आहेत. हा आपला मूर्खपणा आहे की अजूनही आपण एका ठराविक साच्यात राहून काम करतोय.”

आणखी वाचा : “खायला अन्न नाही आणि…” रत्ना पाठक यांची दीपिकाच्या बिकिनी वादाबद्दल संतप्त प्रतिक्रिया

पियुष मिश्रा आता शंकर दिग्दर्शित कमल हासन यांच्या ‘इंडियन २’मध्ये झळकणार आहेत. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम केल्याच्या अनुभवाबद्दलही पीयूष यांनी खुलासा केला आहे. ते म्हणाले, “शंकर यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव फारच अद्भुत होता. संकल्पना साधीच असली तरी ती सादर करताना जे वैविध्य गरजेचं असतं ते शंकर यांच्या प्रत्येक कामात आपल्याला दिसतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबरोबरच पियुष मिश्रा यांनी ‘बॉयकॉट ट्रेंड’बद्दलदेखील वक्तव्य केलं आहे. बॉयकॉट ट्रेंड हा काही प्रमाणात योग्य तर काही प्रमाणात अयोग्य आहे असं त्यांचं मत आहे. पियुष मिश्रा हे सध्या त्यांच्या बॅन्डचे शो करण्यात व्यस्त आहेत. याबरोबरच ते आत्मचरित्रपर कादंबरीसुद्धा लिहीत आहेत जी १३ जानेवारी २०२३ रोजी प्रकाशित होईल.