Poonam Pandey no more part of Delhi Ramlila: दिल्लीच्या लाल किल्ल्यावर लव कुश रामलीला समितीकडून रामलीला दरवर्षी सादर केली जाते. आता रामलीला चर्चेत येण्याचे कारण पूनम पांडे ठरली आहे. काही दिवसांपूर्वी पूनम पांडेने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत या रामलीलेत मंदोदरीचे पात्र साकारणार असल्याचे सांगितले होते.

पूनम पांडे रामलीलामध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे समोर आल्यानंतर अनेकांनी यावर आक्षेप घेतला. भाजपा आणि विश्व हिंदू परिषदेने समितीच्या या निर्णयाचा विरोध केला होता.

दिल्ली भाजपा मीडिया सेलचे प्रमुख प्रवीण शंकर कपूर यांनी आयोजकांना पूनम पांडेला रामलीलेतून वगळण्याचा मागणी केली, तेव्हा या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत प्रवीण शंकर कपूर म्हणाले की पूनम पांडे गेल्या अनेक वर्षांपासून अभिनयापासून दूर आहे. तसेच ती सोशल मीडियावरील तिच्या फोटो आणि व्हिडिओंमुळे होणाऱ्या वादांसाठी ओळखली जाते.

पूनम पांडेला रामलीलेत कास्ट केल्यानंतर होणाऱ्या विरोधानंतर समितीने पूनम पांडेऐवजी दुसरी अभिनेत्री हे पात्र साकारेल असे स्पष्ट केले आहे. २३ सप्टेंबरला घेतलेल्या पत्रकार परिषदेत रामलीला समितीने हा बदल जाहीर केला.

तसेच समितीने जाहीर केलेल्या अधिकृत निवेदनात असे लिहिले आहे की समितीच्या निमंत्रणावरून पूनम पांडेने मंदोदरीची भूमिका साकारण्यास सहमती दर्शविली होती. मात्र, तिचे नाव जाहीर झाल्यानंतर अनेक संस्था आणि संघटना त्यावर आक्षेप घेतला. यामुळे श्री रामाचा संदेश समाजात पोहोचवण्याच्या राम लीलेचा मुख्य उद्देशाला अडथळा येऊ शकतो, असे समितीचे मत आहे. त्यामुळे रामलीलेत पूनम पांडे मंदोदरीचे पात्र साकारणार नाही. तिच्याऐवजी दुसरी अभिनेत्री हे पात्र साकारेल, असा समितीने निर्णय घेतला आहे.

पूनम पांडे व्हिडीओ शेअर करत काय म्हणाली होती?

पूनम पांडेने काही दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. ती म्हणालेली, “दिल्लीच्या लाल किल्ल्यावर जे लव कुश रामलीला सादर केली जाते. त्यामध्ये मला मंदोदरी हे महत्वाचे पात्र साकारण्याची संधी मिळाली आहे. मी खूप आनंदी आहे. मी हेसुद्धा ठरवले आहे की मी पूर्ण नवरात्रीमध्ये उपवास करेन. त्यामुळे मनापासून हे पात्र साकारण्यास मला मदत होईल”, असे म्हणत पूनम पांडेने तिचा आनंद व्यक्त केला होता.

दरम्यान, पूनम पांडे सतत तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. तिने २०१३ ला ‘नशा’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते.