Shilpa Shirodkar failed twice in the 10th Standard: अभिनेत्री शिल्पा शिरोडकरने अगदी कमी वयात अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. ‘मृ्त्यूदंड’, ‘बेवफा सनम’ अशा अनेक चित्रपटांत काम करत अभिनेत्रीने स्वत:ची ओळख निर्माण केली. लग्नानंतर अनेक वर्षे अभिनेत्री चित्रपटांपासून दूर होती.

‘बिग बॉस १८’मध्ये अभिनेत्री स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. खेळाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात शिल्पा शिरोडकर बिग बॉसमधून बाहेर पडली. मात्र, तिच्या बिग बॉसमधील खेळाचे मोठे कौतुक झाले होते. आता एका मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या शिक्षणाबाबत वक्तव्य केले आहे.

शिल्पा शिरोडकर काय म्हणाली?

शिल्पा शिरोडकरने काही दिवसांपूर्वी लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत शिल्पा शिरोडकर म्हणाली, “पाली हिलमध्ये माझं शिक्षण झालं. मी कॉलेजला गेले नाही, कारण माझं करिअर लवकर सुरू झालं. जेव्हा मी दहावीची परीक्षा दिली, तेव्हा मी नापास झाले. विज्ञान व गणित विषयात मी नापास झाले होते. त्यानंतर मी पुरवणी परीक्षा दिली, त्यावेळीसुद्धा मी काम करत होते. मी ती पुरवणी परीक्षादेखील पास होऊ शकले नाही. त्या परीक्षेत मी विज्ञान विषयात पास झाले. पण, मी गणितात नापास झाले.”

“माझी आई मला नेहमी म्हणायची, तू तिसऱ्यांदा परीक्षा दिलीस ना तर तू नक्की पास होशील. पण, मी तिला सांगितलं की आता मी परीक्षा देणार नाही. आता मी काम करते, तर मी दोन्ही गोष्टी करू शकत नाही. त्यानंतर मी अभ्यास सोडला. पण, देवाच्या कृपेने या इंडस्ट्रीने मला एवढं दिलं की असं वाटलं नाही की शिक्षण पूर्ण करायला हवं होतं. मला वाटतं की मी असं करिअर निवडलं, ज्यामध्ये शिक्षण पूर्ण कऱण्याची गरज नव्हती.”

शिल्पा शिरोडकरने १९८९ ला ‘भ्रष्टाचार’ या चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटात रेखा व मिथुन चक्रवर्ती प्रमुख भूमिकेत होते. त्यानंतर अभिनेत्रीने ‘त्रिनेत्रा’, ‘किशन कन्हैय्या’, ‘हम’ या चित्रपटांत काम केले. या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शिल्पा शिरोडकर आता आगामी काळात कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.